रेडी येथे 'व्यसनमुक्त गड संवर्धन' मोहिमेचा शुभारंभ

रेडी
११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता रेडी येथील यशवंतगडावर ‘व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा’ शुभारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व बी. डी. ओ. वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीचे फलक उभारण्यात आले.
उपक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव अमोल स.भा. मडामे, रेडीचे सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच आनंद भिसे, माजी जिल्हा सभापती अजित सावंत तसेच आरवली गावचे सरपंच समीर कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र, नशामुक्त भारत अभियान टीम, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस यंत्रणा, दुर्गा मावळा ग्रुप सिंधुदुर्ग, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी, पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा खर्डेवाडी व जिल्हा तंबाखू नियंत्रण विभाग यांसारख्या संस्थांनी सहभाग घेतला.सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी प्रास्ताविकात व्यसनमुक्ती मोहिमेला जनआंदोलनाचा स्वरूप देण्याचे उद्दिष्ट सांगितले. नशाबंदी मंडळाच्या ‘मासिक कल्याणयात्रा-व्यसनमुक्तीच्या गाथा’चे प्रकाशन बी. डी. ओ. वासुदेव नाईक व पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमात व्यसनमुक्तीवरील पोस्टर, ऐतिहासिक शस्त्रे, संदर्भ ग्रंथ प्रदर्शन आणि ‘व्यसनमुक्तीची साप शिडी’ हा खेळ आयोजित केला गेला. उपस्थित मान्यवरांनी या मोहिमेची आवश्यकता आणि महत्त्व स्पष्ट केले.अमोल मडामे यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि संस्कारांचा उल्लेख करून व्यसनमुक्त गड किल्ले संवर्धन मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला. बी. डी. ओ. वासुदेव नाईक यांनी कार्यक्रमाबद्दल आपली खुशी व्यक्त केली. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शनपर भाषण दिले व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ घालवली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दर्शना पाताडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश नाईक यांनी केले.