महागाईच्या आगीत भर!.....२६ डिसेंबरपासून रेल्वे प्रवासही महागणार....लांब पल्ल्याच्या तिकिटात १० ते ५० रुपयांची वाढ

महागाईच्या आगीत भर!.....२६ डिसेंबरपासून रेल्वे प्रवासही महागणार....लांब पल्ल्याच्या तिकिटात १० ते ५० रुपयांची वाढ

 

दिल्ली

 

   देशात आधीच महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडलेली असताना आता रेल्वे प्रवासही महाग होणार आहे. रेल्वे विभागाने लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या तिकिटात १० ते ५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर २६ डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या परिपत्रकातून देण्यात आली आहे.
   २१५ किमी किंवा त्याहून अधिक अंतराच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर १ पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, थर्ड एसी इकॉनॉमी तसेच स्लीपर कोचच्या तिकिटांवर याचा परिणाम होणार आहे. उदाहरणार्थ, लखनौ मेलच्या विविध वर्गातील तिकीटदर २६ डिसेंबरपासून वाढून अनुक्रमे १,९८० रुपये, १,१९० रुपये, ८५५ रुपये, ७९५ रुपये आणि ३४० रुपये होण्याची शक्यता आहे.याशिवाय शताब्दी एक्सप्रेसच्या चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकिटांचे दरही वाढणार असून हे दर अनुक्रमे २,१७६ रुपये आणि १,४१६ रुपये होतील. लखनौ–मुंबई पुष्पक एक्सप्रेस तसेच बेगमपुरा एक्सप्रेसच्या विविध वर्गातील भाड्यातही वाढ होणार आहे.
       या भाडेवाढीमुळे रेल्वेला सुमारे ६०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे दैनंदिन प्रवासी, अल्प पल्ल्याचा प्रवास, लोकल (उपनगरीय) सेवा आणि मासिक पासच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच २६ डिसेंबरपूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून वाढीव भाडे आकारले जाणार नसल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.
     महत्त्वाचे म्हणजे यंदा रेल्वे तिकिटांच्या दरात ही दुसरी वाढ असून, यापूर्वी १ जुलै रोजी मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यात प्रति किलोमीटर १ पैशांची वाढ करण्यात आली होती. महागाईच्या पार्श्वभूमीवर ही नवी दरवाढ प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.