आई–मुलाच्या नात्याला रक्ताचे गालबोट......अणसुरमध्ये हृदयद्रावक मातृहत्याकांड
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे माणुसकीला काळीमा फासणारी, आई–मुलाच्या नात्यालाच हादरवून सोडणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. जन्म देणाऱ्या आईवरच तिच्या जन्मदात्या मुलाने बंदुकीची गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून गावावर शोककळा पसरली आहे.वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) या आपल्या घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे शांतपणे खुर्चीवर बसल्या होत्या. मात्र काल रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आयुष्यातील ही शांतता कायमची संपुष्टात आली. कौटुंबिक वाद आणि कर्जाच्या तणावातून संतप्त झालेल्या जन्मदात्या मुलानेच उमेश वासुदेव सरमळकर याने आईच्या जीवावर उठत छपरावरून थेट गोळी झाडली.छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याने वासंती सरमळकर जागीच कोसळल्या.आईच्या रक्तात माखलेल्या अंगणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ही घटना दि. १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अणसुर पाल मडकीलवाडी, तालुका वेंगुर्ला येथे घडली. ज्या आईने लेकरासाठी आयुष्य झिजवले, त्याच आईचा अंत तिच्याच मुलाच्या हातून झाल्याने प्रत्येक संवेदनशील मन हादरून गेले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. याच कर्जावरून आई व मुलामध्ये वारंवार वाद होत होते. मात्र या वादाचा शेवट इतका भयावह आणि रक्तरंजित असेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. या प्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी उमेश सरमळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीविरुद्ध बीएनएस कलम १०३(३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २७, २९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करीत आहेत.
आई–मुलाच्या नात्याची इतकी भीषण पायमल्ली करणाऱ्या या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाच हादरून गेला असून, “कर्ज आणि तणाव माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकतो?” असा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समाजासमोर उभा राहिला आहे.

konkansamwad 
