सिंधुदुर्गाच्या राजकारणातून राणेंना संपविण्याचे प्रयत्न सुरू......सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी मी सज्ज.....कणकवलीमध्ये खासदार नारायण राणे गरजले
कणकवली
मी जेवढी पद घेतली, त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परिस्थितीनुसार बदललो, पण कधीही माझ्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. तुम्हीही करू नका, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात मतभेद निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला थारा देऊ नका असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी कणकवलीतील जाहीर मेळाव्यात केले. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीत झालेल्या या सभेत राणेंनी आपल्या ३६ वर्षांच्या राजकीय वाटचालीचा, संघर्षाचा आणि सिंधुदुर्गच्या विकासाचा सविस्तर आढावा घेतला.
राणे म्हणाले, मी श्रीमंत घरात जन्माला आलो नाही. १९६६ साली वयाच्या १५व्या वर्षी शिवसैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केला. १९८३ मध्ये शाखाप्रमुख, त्यानंतर नगरसेवक, बीएसटी चेअरमन, आमदार, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा प्रवास कार्यकर्त्यांच्या बळावरच झाला. १९९० साली बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने कोकणात आलो आणि खारेपाटणला पाऊल ठेवताना जिल्ह्यात गरिबी राहू देणार नाही अशी शपथ घेतली होती, ती शपथ सिंधुदुर्गातील गरीबी हटावला प्राधान्य दिले.
ते म्हणाले, मी जिल्ह्यात आलो तेव्हा दरडोई उत्पन्न ३५ हजार रुपये होते. पिण्याचे पाणी, आरोग्य, रस्ते यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. आज हेच दरडोई उत्पन्न २ लाख ६० हजारांपर्यंत पोहोचले असून ३१ मार्च २०२६ पर्यंत ते ३ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील धरणे, रस्ते, आरोग्य सुविधा, वीज, पूल, विमानतळ अशा पायाभूत सुविधांचा उल्लेख करत त्यांनी "हे काम कुणी केले असेल तर नाव सांगा," असे आव्हान दिले.
राजकारणातील पैशांच्या वापरावर टीका करताना राणे म्हणाले, "पैशासाठी राजकारण करू नका. पैसे देऊन माणसं विकत घेण्याची पद्धत चुकीची आहे. पैसे घेऊन निष्ठा विकू नका. असे पैसे कधीच पचत नाहीत." कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, "डगमगू नका. माणसाला माणूस शोधा, त्याला कामाला लावा आणि सर्वसामान्यांना उत्पन्नाचे मार्ग दाखवा."
सिंधुदुर्गाच्या राजकारणातून राणेंना संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्न केलेत. पण कुणालाही ते जमलेल नाही. सिंधुदुर्गच्या राजकारणात नवे नेते देखील येऊ घातले आहेत. पण सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी मी सज्ज आहे. वय झाल तरी मी हटणार नाही असा इशारा खासदार नारायण राणे यांनी आज दिला.
कणकवलीतील सभेत त्यांनी पैसे घेऊन आपली निष्ठा विकू नका असेही आवाहन त्यांनी केले. इथे पैशाचं राजकारण करू नका. पैसे घेऊन माणसं विकत घेणं चुकीचं आहे. असे घेतलेले पैसे कधीही पचत नसतात. आजारपण इतर काही संकट येतात. त्यात तो पैसा निघून जातो. दरम्यान आता निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना "कोटी" कळू लागले आहेत. राणेंपासून दूर होण्यासाठी काहींना "कोटी" मिळताहेत. ते कोटी घ्या आणि बिनधास्तपणे माझ्यापासून दूर व्हा. पण जिथे जाल तिथे निष्ठा सांभाळा. पक्षाशी प्रामाणिक राहा असही राणे म्हणाले.
आपल्या कुटुंबीयांबाबत बोलताना राणेंनी निलेश आणि नितेश राणे यांच्या कार्याचे कौतुक केले. "माझ्यानंतर निलेश आहे. निलेश आणि नितेश सक्षमपणे जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे," असे ते म्हणाले.
सभेच्या शेवटी त्यांनी भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीने एकत्र राहण्याचे आवाहन केले. द्वेषाला राजकारणात थारा देऊ नका. प्रेमाने माणसं जोडा, असे सांगत कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आपण भारावून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या मेळाव्याला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सौ, नीलमताई राणे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, संजय आग्रे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, संजय पडते, गोट्या सावंत, दीपलक्ष्मी पडते, प्रमोद कामत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

konkansamwad 
