शिरोडा येथे घरफोडी.....अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास
शिरोडा
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा परबवाडा परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे मिळून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, हि चोरी परबवाडा, शिरोडा येथे घडली. या प्रकरणी पल्लवी पांडुरंग परब (वय ४९ वर्षे) यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात (१२ जानेवारी) रोजी फिर्याद दिली त्यामुळे त्याच रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार घराबाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्याने वीज मीटरच्या उघड्या बॉक्समध्ये ठेवलेली घराची चावी वापरून मुख्य दरवाजाचे कुलूप उघडले.त्यानंतर घरात प्रवेश करून चोरट्याने घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.या घरफोडीत चोरट्याने सुमारे चार तोळे वजनाचे जुने वापरते सोन्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे १ लाख ६० हजार रुपये), चार ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची चैन (किंमत २०,००० रुपये), दहा ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची चैन (किंमत ५०,००० रुपये) तसेच १५,००० रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.घटनेनंतर दोन दिवस घरात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही चोरीस गेलेला मुद्देमाल न सापडल्याने उशिराने फिर्याद दाखल करण्यात आल्याचे कारण तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.

konkansamwad 
