वेंगुर्लेत एस.टी. आगार साई मंदिराच्या उत्सवास प्रारंभ

वेंगुर्लेत एस.टी. आगार साई मंदिराच्या उत्सवास प्रारंभ

 

वेंगुर्ले


     वेंगुर्ले येथील एस.टी. आगारातील श्री साई मंदिर देवस्थानच्या वर्धापनदिन उत्सवास आजपासून अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि श्री साई बाबांच्या भव्य पालखी मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. माघ शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर आयोजित या सोहळ्याने संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालखी मिरवणुकीने सुरुवात

आज सकाळी ८ वाजता श्री गणेश पूजन आणि विविधांगी धार्मिक विधींनी उत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर 'ओम साई राम'च्या गजरात आणि वाद्यांच्या निनादात साई बाबांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने वेंगुर्ले शहराला प्रदक्षिणा घातली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि पुष्पवृष्टी केली.

उत्सवाचे कार्यक्रम

दुपारी ३ वाजता हळदीकुंकू सोहळा पार पडला. सायंकाळी ४ वाजल्यापासून स्थानिक भजन मंडळे व ब्राह्मण भजन मंडळ तेर्सेबांबर्डे यांची भजने होणार आहेत. रात्री ७६ वाजता पुन्हा पालखी मिरवणूक आणि रात्री ८:३० वाजता पार्सेकर द.ना. मंडळाचा 'कर्म प्रारब्ध' हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाईल.

उद्या कार्यक्रम

उद्या माघ शुद्ध द्वितीया, मंगळवार २० जानेवारी रोजी महारुद्र व जप सांगता, साईबाबांची महापूजा आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता धनुप्रिया प्रॉडक्शन निर्मित 'एकापेक्षा एक' हे धमाल कौटुंबिक मालवणी नाटक सादर होणार आहे.

भाविकांना आवाहन

या मंगलमयी उत्सवकाळात भाविकांनी सर्व धार्मिक विधी, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई मंदिर देवस्थान समिती व रा.प. वेंगुर्ला आगारातील कर्मचारीवृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.