पाट तीठ्यावर डंपर आणि दुचाकी यांच्यात अपघात, मुलीचा जागीच मृत्यू

पाट तीठ्यावर डंपर आणि दुचाकी यांच्यात अपघात,  मुलीचा जागीच मृत्यू

कुडाळ 

 

        कुडाळ तालुक्यातील पाट तिठ्यावर वाळू वाहतूक करणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याची घटना घडली आहे.अपघातात डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेली पाट हायस्कूलची विद्यार्थिनी मनस्वी मेतर हीचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना पाट तिठा येथील माऊली मंदिर नजीक येथे घडली. याबद्दल अधिक माहिती अशी की, मनस्वी मेतर ही पाट हायस्कूल मध्ये दहावीत शिक्षण घेत होती. सध्या दहावीच्या परीक्षा चालू असून ती हायस्कूल मध्ये क्लाससाठी जात होती. हुमरमळा येथील तिच्या ओळखीतील मुलाने तिला म्हापण येथे मोटारसायकलवर डबलसीट बसवून दोघेही पाट हायस्कूल मध्ये जात होते. तर सकाळी वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे-पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. या दरम्याने पाट माऊली मंदिर येथील मार्गावर डंपर आला असता डंपर व मोटार सायकल या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात मोटार सायकलस्वारच्या मागे बसलेली मनस्वी ही मुलगी खाली पडली व डंपरच्या मागच्या चाकाखाली येत ती गंभीर जखमी झाली व तिचा जागीच मृत्यू झाला. तर मोटर सायकलस्वार ला किरकोळ दुखापत झाली. सदर घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक दिलीप शेटये, सुनील सावंत व विक्रांत लोणे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर निवती पोलीस ठाण्यात याप्रकरणी डंपर चालक तसेच सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा व मोटरसायकलचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.