वैदेही देऊलकर हिचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान

वैदेही देऊलकर हिचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान

 

सावंतवाडी

 

     शिक्षण नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक असलेली मुळ केसरी येथील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स खेळाडू वैदेही अभय देऊलकर हिला राज्य शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैदेहीने वयाच्या सहाव्या वर्षी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे जिम्नॅस्टिकला सुरुवात केली. तिने आतापर्यंत ७ स्कूल नॅशनल्स आणि ६ फेडरेशन नॅशनल्स (ज्युनिअर गटात) स्पर्धा खेळल्या आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये तिने वैयक्तिक यश, पदके आणि आपली ओळख निर्माण केली. २०१६ मध्ये तिला तुर्की येथे झालेल्या वर्ल्ड स्कूल गेम्ससाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आले होते. यानंतर वैदेहीने वरिष्ठ गटात प्रवेश केला आणि सीनियर नॅशनल्समध्ये चमकदार कामगिरी केली. तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ३ सीनियर नॅशनल्स खेळल्या, ज्यात एक वैयक्तिक कांस्य पदक आणि दोन संघ विजेतेपद मिळवली. तिने अमृतसर येथे झालेल्या युनिव्हर्सिटी नॅशनल स्पर्धेत मुंबई विद्यापीठासाठी कांस्य पदक जिंकले. तिला चीनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी भारतीय संघातही निवडण्यात आले होते, परंतु कोविड-१९ मुळे ती स्पर्धा रद्द झाली. वैदेहीने 'खेलो इंडिया' उपक्रमांतर्गत ३ वेळा भाग घेतला आणि विविध पदकांची कमाई केली. २०२४ च्या ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्र सरकारकडून तिची संभाव्य खेळाडू म्हणून निवड झाली आणि तिला तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली.