शेतकऱ्यांवरील असंवेदनशील वक्तव्यावर सिंधुदुर्ग काँग्रेसचा तीव्र निषेध

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या निर्लज्ज आणि असंवेदनशील वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
इर्शाद शेख म्हणाले की, शेतकऱ्यांना “कर्जमाफीचा नाद लागलाय” आणि “आम्हाला निवडून यायचे असते म्हणून आम्ही आश्वासन देतो, पण काय मागणी करायची हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे” असे वक्तव्य हे फक्त राजकीय बेफिकिरी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या वेदनेची खिल्ली उडवणारे आहे.आज महाराष्ट्रातील शेतकरी अनियमित पावसामुळे, वाढत्या उत्पादन खर्चामुळे, बाजारात योग्य भाव न मिळाल्यामुळे आणि कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या आयुष्यामुळे कठीण काळातून जात आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचे सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी केलेले असंवेदनशील वक्तव्य हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे स्पष्ट उदाहरण आहे.शेतकऱ्यांवर संकट कोसळण्याचे मुख्य कारण केंद्र आणि राज्य सरकारची चुकीची धोरणे असून, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे तरी पिकांना हमीभाव मिळत नाही. वीज, खत आणि बियाण्यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत, आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई फक्त घोषणांपुरती मर्यादित राहते.
इर्शाद शेख यांनी सांगितले की, मंत्री महोदयांचे वक्तव्य हे जनतेच्या विश्वासाचा संपूर्ण विश्वासघात आहे. निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मत मागितले जाते, परंतु सत्तेत आल्यानंतर ते शब्द पाळले जात नाहीत.काँग्रेस पक्ष अशा असंवेदनशील वक्तव्याचा तीव्र निषेध करतो आणि बाबासाहेब पाटील यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करतो. जर सरकारने दुर्लक्ष केले, तर राज्यभर आंदोलन उभारले जाईल आणि शेतकऱ्यांचा आवाज रस्त्यावर गाजवला जाईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायम लढत राहील आणि त्यांना न्याय, कर्जमाफी, हमीभाव व सन्मानपूर्ण जीवन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे इर्शाद शेख यांनी ठामपणे सांगितले.