भारत-चीन थेट विमान वाहतुकीला २६ ऑक्टोबर पासून सुरुवात

नवी दिल्ली
पूर्व लडाखमधील सीमावादानंतर बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाच वर्षांपासून खंडित असलेली भारत-चीन थेट विमानसेवा पूर्ववत होणार आहे. चीनच्या तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली होती. या भेटीनंतर येत्या २६ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्रालयातर्फे देण्यात आली.दोन्ही देशांमधील थेट विमान सेवा २०२०च्या करोना काळापासून बंद ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्व लडाखमधील चार वर्षांहून अधिक काळाच्या सीमा संघर्षाच्या अखेरनंतरही ही सेवा पूर्ववत करण्यात आली नव्हती. ‘या वर्षाच्या सुरुवातीपासून भारत आणि चीनमधील संबंध सामान्य करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांमधील नागरी विमान वाहतूक अधिकारी दोन्ही देशांमधील थेट हवाई सेवा पूर्ववत करण्यासाठी आणि सुधारित हवाई सेवा कराराबाबत तांत्रिक स्तरावर चर्चा करत आहेत.