पुलवामा त्राल भागात तीन दहशतवादी ठार

पुलवामा त्राल भागात तीन दहशतवादी ठार

 

 

जम्मू काश्मीर


 

     जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. येथील त्राल भागातील नादिर गावात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले. त्यांची ओळख पटली असून आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वणी आणि अहमद भट अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही दहशतवादी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.१५ मे रोजी गुप्तचर एजन्सीकडून मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे भारतीय सैन्यदल, जम्मू- काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ जवानांनी संयुक्तरित्या नादर, त्राल, अवंतीपोरा येथे घेराबंदी आणि शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान सतर्क जवानांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला आणि त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युतर दिले. येथे अद्याप चकमक सुरु असल्याची माहिती भारतीय सैन्याच्या चिनार कॉप्सने दिली आहे. शोपियान जिल्ह्यातील केलर भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर दोन दिवसांनी पुलावामा जिल्ह्यात चकमक झाली. मंगळवारच्या कारवाईत ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दोघेही शोपियानचे रहिवासी आहेत. शाहिद कुट्टय आणि अदनान शफी अशी त्यांची नावे आहेत. कुट्टय याचा गेल्या वर्षी ८ एप्रिल रोजी डॅनिश रिसॉर्टमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सहभाग होता. या घटनेत जर्मनीचे दोन पर्यटक आणि एक चालक जखमी झाला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात शोपियानमधील हीरपोरा येथील भाजप सरपंचाच्या हत्येतही त्याचा हात होता, अशी माहिती समोर येते तर शफी २०२४ मध्ये दहशतवादी गटात सामील झाला होता. त्याचा शोपियानमधील वाची येथे एका कामगाराच्या हत्या प्रकरणात सहभाग होता, असे सांगण्यात येते. शोपियानमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन एके-४७ रायफल आणि इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता.