सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईन योजनेचे उद्घाटन

सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईन योजनेचे उद्घाटन

 

सावंतवाडी

 

 सावंतवाडी शहराच्या आधुनिकतेत आणि सोयीसुविधांमध्ये आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. शहरातील सर्वोदय नगर, न्यू सालईवाडा परिसरात बहुप्रतीक्षित गॅस पाईपलाईन योजनेचे (PNG) आज बुधवारी सकाळी 11 वाजता उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

नगरसेवक गोंदावळे यांच्या हस्ते लोकार्पण

नगरसेवक अजय वसंत गोंदावळे यांच्या निवासस्थानी गॅस शेगडी प्रज्वलित करून या सेवेचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.

महिलांना मिळणार दिलासा

शहरातील घरगुती गॅस वापराची पद्धत आता बदलणार असून, सिलिंडरच्या कटकटीतून मुक्तता देणारी ही पाईपलाईन सेवा आता सर्वोदय नगरमधील घराघरांत पोहोचली आहे. या प्रकल्पामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

सुविधांचे नवे पर्व

"शहराचा विकास होत असताना अत्याधुनिक सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. गॅस पाईपलाईनमुळे इंधनाची बचत होईलच, पण सुरक्षितता आणि सुलभताही वाढेल," असे मत यावेळी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी व्यक्त केले.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित

या सोहळ्याला नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, नगरसेविका स्नेहा नाईक आणि शर्वरी धारगळकर यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वोदय नगर संघ महिला अध्यक्षा दिशा कामत, सौ. बार्देसकर मॅडम, सौ. साटेलकर यांच्यासह परिसरातील अनेक महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.