दारू वाहतूक प्रकरणी आंध्रप्रदेशातील चौघे ताब्यात.....स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई....१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

दारू वाहतूक प्रकरणी आंध्रप्रदेशातील चौघे ताब्यात.....स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई....१४ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

बांदा

 

   बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी आंध्रप्रदेश येथील चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १४ लाख ४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेख तौफी रफीवाली (वय २४, रा. तपोवन, आंध्रप्रदेश), पेयला कोंडारेड्डी (रा. अनंतपूर, आंध्रप्रदेश), वेण्णापुसा भास्कर रेड्डी (रा. यादीकि, आंध्रप्रदेश), नागिरेड्डी गरी दिलीपकुमार (रा. आत्मापूर, आंध्रप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई भालावल येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून करण्यात आली.
       याबाबत अधिक माहिती अशी की, भालावल येथील दळवी यांच्या बागेसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणारी निळ्या रंगाची टाटा नेक्सॉन कार अडवण्यात आली. पोलीस आल्याचे पाहताच गाडीतील दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
         या कारवाईत पोलिसांनी गोवा बनावटीची २ लाख ४ हजार रुपये किंमतीची दारू, बारा लाख किमतीची टाटा नेक्सॉन कार असा एकूण १४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यात सदर वाहनाला दोन नंबर प्लेट लावल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, सदर गाडीवर एमएच -०९-डीएफ ६५२९ ही बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. मात्र गाडीची मूळ नंबर प्लेट एपी ०४बीयू ८००८ असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शेख तौफी रफीवाली, पेयला कोंडारेड्डी, वेण्णापुसा भास्कर रेड्डी, नागिरेड्डी गरी दिलीपकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोजा आणि आशिष जामदार यांच्या पथकाने केली.
आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बांदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.