राज्यातील सहा जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा.

मुंबई.
राज्यातील काही भागातच पाऊस पडत आहे. बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहिले आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील सहा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
तळकोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीत पावसाचा जोर कायम आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन मच्छ विभागानं केलं आहे. शनिवारी सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. तर, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या.