सिंधुदुर्गात भाजप बंडखोर आणि ठाकरे गटाची 'विकास आघाडी' स्थापन

सिंधुदुर्गात भाजप बंडखोर आणि ठाकरे गटाची 'विकास आघाडी' स्थापन

 

सिंधुदुर्गनगरी

 

        सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना महायुतीवर अंकुश ठेवण्यासाठी अपक्ष निवडून आलेल्या ६ सदस्यांनी आणि ठाकरे शिवसेनेच्या ३ सदस्यांनी एकत्र येत 'सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी' नावाचा नवा गट स्थापन केला आहे. या गटाच्या स्थापनेचे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले असून, इन्सुली मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले नितीन राऊळ यांची गटनेते म्हणून सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे.या नव्या समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नूकतीच जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजप आणिप शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढले होते. या निवडणुकीत भाजपचे २७ आणि शिवसेनेचे १४ असे एकूण ४१ सदस्य निवडून आले होते, तर ठाकरे शिवसेनेचे केवळ तीन सदस्य विजयी झाले होते. मात्र, या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सहा अपक्ष उमेदवारांनी मारलेली बाजी होय. हे सहाही सदस्य भाजपचे बंडखोर असून त्यांनी कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले आणि सावंतवाडी यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांतून विजय मिळवला आहे.