IDFC बँक घोटाळ्याने बँकिंग क्षेत्र हादरले......शेअर २० टक्क्यांनी कोसळले !
नवी दिल्ली
आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत उघडकीस आलेल्या ५९० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यामुळे सोमवारी शेअर बाजारात त्याचे पडसाद उमटले. बँकेचा शेअर थेट २० टक्क्यांनी कोसळला.परिणामी गुंतवणूकदार आणि खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. "हा घोटाळा म्हणजे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेतील त्रुटी नाही, रिझर्व्ह बँक या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे," असे आश्वासन मल्होत्रा यांनी दिले.बँकिंग क्षेत्राच्या आरोग्याबाबत माहिती देताना गव्हर्नर म्हणाले की, सध्या भारतीय बँकांची स्थिती अत्यंत मजबूत आहे. सध्या बँकिंग प्रणालीची भांडवल पर्याप्तता १७% आहे, जी नियमानुसार आवश्यक असलेल्या ११.५% पेक्षा कितीतरी जास्त आहे. बँकांचे थकीत कर्ज कमी झाले असून नफा क्षमता वाढली आहे. 'विकसित भारत'चे ध्येय गाठण्यासाठी बँकिंग व्यवस्था पूर्णपणे सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गव्हर्नर यांनी दिलासा दिला असला, तरी शेअर बाजारात मात्र या बँकेच्या शेअरची मोठी धुलाई झाली. सोमवारी व्यवहारादरम्यान बँकेचा शेअर २० टक्क्यांपर्यंत कोसळला होता. दुपारी १२:३५ च्या सुमारास शेअर १६ टक्क्यांच्या घसरणीसह ७०.३९ रुपयांवर व्यवहार करत होता. ब्रोकरेज कंपन्यांच्या मते, ५९० कोटींची ही रक्कम बँकेच्या निव्वळ मालमत्तेच्या सुमारे ०.९% आहे. मात्र, २०२६ आर्थिक वर्षाच्या करपूर्व नफ्यावर याचा २० ते २२ टक्क्यांपर्यंत मोठा परिणाम होऊ शकतो.बँकेने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि स्वतंत्र ऑडिटसाठी 'KPMG' या जागतिक स्तरावरील नामांकित संस्थेची नियुक्ती केली आहे. चंदीगड शाखेतील काही कर्मचाऱ्यांनी हरियाणा सरकारच्या खात्यांमध्ये फेरफार करून ५९० कोटींचा अपहार केल्याचा ठपका आहे. बँकेने आधीच चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. इतर बँकांमधील संबंधित खात्यांमधून पैसे परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या घोटाळ्यानंतर हरियाणा सरकारने आक्रमक पवित्रा घेत IDFC First Bank आणि AU Small Finance Bank या दोन बँकांना सरकारी कामातून तातडीने बाहेर केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत या बँकांमध्ये सरकारी निधी जमा किंवा गुंतवला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

konkansamwad 
