सी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.
नवीदिल्ली.
झारखंडचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. काल मध्यरात्री एकच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आले.
देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून याबद्दलचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकात नवीन राज्यपालांची नावे जाहीर करण्यात आली. यानुसार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राधाकृष्णन हे रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. तर झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे सोपविण्यात येईल. त्यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधाची सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. ते मुळचे तामिळनाडूचे आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राधाकृष्णन यांनी 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते.