कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांनी शिवरॅली काढत साजरी केली शिवजयंती

कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांनी शिवरॅली काढत साजरी केली शिवजयंती

 

सावंतवाडी

 

         सावंतवाडी येथील एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता-पहिली ते चौथीच्या मुलांनी शिवरायांच्या विविध वेशभूषा सादर करत कळसुलकर शाळा ते उभा बाजार येथील शिवस्मारकापर्यंत शिवरॅली काढत शिवजयंती उत्साहामध्ये साजरी केली. यामध्ये जिजाऊ, शिवराय, शंभुराजे, तानाजी मालुसरे, शिवा काशिद, सईबाई, सोयराबाई, मावळे अशा व यांसारख्या अनेक वेशभूषा मुलानी साकार केल्या. सकाळी शाळेमध्ये शिवप्रतिमेचे पूजन झाल्यानंतर सर्व मुलांनी शिवरायांच्या घोषणा देत रॅलीमध्ये सहभागी होत उभाबाजार येतील शिवपुतळ्यासमोर विविध कार्यक्रम सादर केले. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कुमारी आत्रेया हिने शिवगर्जना सादर केली. त्यानंतर मुलांनी भाषणे केली. शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री. डी.जी वरक यांनी पोवाडा गीत सादर केले तसेच त्यांनी मुलांना शिवजन्माविषयी माहिती दिली.यावेळी स्थानिक मित्र मंडळाच्यावतीने मुलांना खाऊ तसेच अल्पोपहार देण्यात आला. पुन्हा शिवरायांचा जयघोष करत ही रॅली शाळेकडे येत कार्यक्रमाची सांगता झाली. एकंदरीत कळसुलकर शाळेने राबवलेल्या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी विशेष प्रोत्साहन दिले. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, डी.जी.वरक, अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर आदी शिक्षक, पालक व बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले.