घाट चढणारी परीक्षा; सिंधुदुर्गातील उमेदवारांचा संताप
सिंधुदुर्ग
स्थानिक भरती, पण परीक्षा परजिल्ह्यात — या विसंगतीने सिंधुदुर्गात खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या लिपिक भरतीसाठी २८ फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेची केंद्रे ऐनवेळी बदलल्याने हजारो उमेदवारांना घाट ओलांडून मुंबई–पुणे गाठावे लागणार आहे. या भरतीसाठी तब्बल ५,०७३ अर्ज आले. सुरुवातीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पणजी, म्हापसा अशी जवळची केंद्रे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र अंतिम यादीत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई हीच केंद्रे देण्यात आली. परिणामी, ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास अटळ ठरला.
"स्थानिक परीक्षा, मग बाहेर का?"
अचानक बदलामुळे प्रवास, राहण्याची सोय आणि खर्च यांचा मोठा ताण उमेदवारांवर आला आहे. “नोकरीची संधी आहे, पण परीक्षा देण्यासाठीच मोठा खर्च करावा लागतोय,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
परीक्षा Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत ऑनलाइन घेतली जात आहे. प्रशासनाचे म्हणणे असे—
उच्च दर्जाची तांत्रिक सुरक्षा आवश्यक, हाय-स्पीड इंटरनेट व सर्व्हर सुविधा मोठ्या शहरांत उपलब्ध, स्थानिक केंद्रांसाठी प्रयत्न झाले; मात्र निकष पूर्ण न झाल्याने बदल अपरिहार्य, मुद्दा फक्त केंद्रांचा नाही…कोकणात अद्ययावत परीक्षा सुविधा का उपलब्ध नाहीत, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहे. पारदर्शकतेसाठी आयबीपीएसची साथ योग्य असली, तरी त्याची किंमत स्थानिक तरुणांनीच का मोजावी?
२८ फेब्रुवारीला हजारो उमेदवार परीक्षा देण्यासाठी निघणार आहेत — हातात प्रवेशपत्र, मनात आशा… आणि प्रशासनाच्या निर्णयाबद्दलची खंतही.

konkansamwad 
