आंबा बागायतदारांच्या प्रगतीसाठी 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करणार - मनिष दळवी
वेंगुर्ले
ज्या पद्धतीने घाटमाथ्यावर एआय टेक्नॉलॉजी वापरून उसाचे पीक दुप्पट करण्यात आले आहे, त्याप्रमाणे भविष्यात आपल्याला सुद्धा एआय टेक्नॉलॉजी वापरून आंबा पिकाची प्रगती करावी लागेल. यासाठी जिल्हा परिषद स्तरावर कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू असून, आपण याबाबतीत पाठपुरावा करून पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार आहोत. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येण्याची गरज होती आणि आपण एकत्र आलात हीच मोठी ताकद आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत आंबा बागायतदारांना जास्तीत-जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. कधी अति थंडी तर कधी अति उष्णता अशा बदलत्या हवामानामुळे आंब्याची फळगळ होऊन बागायतदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुढील दिशा ठरवण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व आंबा बागायतदार शेतकरी आणि व्यापारी (करारधारक) यांची एकत्रित बैठक बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या उपस्थितीत जिल्हा बँक वेंगुर्ले शाखा येथे संपन्न झाली. यावेळी बागायतदारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, सध्याच्या वातावरणात फवारणीसाठी वापरली जाणारी औषधेही निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी औषध कंपन्या, कृषी विभाग आणि फळ संशोधन केंद्र यांची तातडीने एकत्रित बैठक घेऊन खते व औषधांच्या दर्जावर चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, जिल्हा आंबा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, जनार्दन पडवळ, नितीन मांजरेकर, ज्ञानेश्वर केळजी, जगन्नाथ सावंत, श्यामसुंदर राय, संदेश निकम, दाजी परब, विष्णू फणसेकर, नितीन कुबल, प्रकाश बोवलेकर, प्रणव नाडकर्णी, विलास ठाकूर, रमेश नार्वेकर, रमण वायंगणकर, कमलेश गावडे, उपेंद्र रावले, देवराज गवंडे, महादेव गावडे, विश्राम गावडे, तानाजी परब, विष्णू उर्फ दादा गावडे, बाळाजी प्रभू यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा बागायतदार आणि व्यापारी उपस्थित होते.

konkansamwad 
