वाफोली - इन्सुली सीमेवर मगरीच्या हल्ल्यात बैल जखमी.....योग्य तो बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

वाफोली - इन्सुली सीमेवर मगरीच्या हल्ल्यात बैल जखमी.....योग्य तो बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

 

बांदा

 

         बांदा परिसरातील तेरेखोल नदीकाठी एक थरारक घटना घडली. वाफोली- इन्सुली सीमेवरील रूमडाची कोंड येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात एक बैल गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वाफोली येथील समीर शिरोडकर यांचा बैल नदीकाठी चरण्यासाठी गेला होता. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक बैलावर झडप घातली आणि त्याच्या पायाचा लचका तोडला. या हल्ल्यात बैल रक्ताळलेल्या अवस्थेत गंभीर जखमी झाला, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. तेरेखोल नदी पात्रात गेल्या काही दिवसांपासून मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मगरी आता पाळीव प्राण्यांना लक्ष्य करत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी उशिरा घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला आहे. वनविभागाने या भागाची तातडीने पाहणी करावी आणि भविष्यात असे हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, नदीकाठी जनावरे नेताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.