परुळे बाजार ग्रामपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमांचा विद्यार्थ्यांकडून अभ्यास दौरा

परुळे बाजार ग्रामपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमांचा विद्यार्थ्यांकडून अभ्यास दौरा

परुळे

 

       नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ अँड रिसर्च, मुंबई येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देत स्वच्छता विषयक राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.
         या भेटीदरम्यान संस्थेच्या रोझी जोसेफ, राजाराम गावडे, गणेश चव्हाण, निलेश गावडे, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी तथा प्रशासन अधिकारी निलेश मठकर यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर व माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभु उपस्थित होते.
        प्रशिक्षणार्थींना माजी सरपंच प्रदीप प्रभु व सरपंच प्रणिती आंबडपालकर यांनी मार्गदर्शन केले. ग्रामविकास व स्वच्छता उपक्रम राबविताना येणारी विविध आव्हाने, प्रशासनिक अडचणी तसेच त्यांवर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी सविस्तर दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच “काथ्या प्रकल्प” युनिटला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेची कार्यपद्धती जाणून घेत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.भेटीनंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत परुळे बाजार ग्रामपंचायत हे आदर्श गाव कसे असावे याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे व स्वच्छतेबाबतच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गावाने वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.