राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांना शरद पवार देणार बळ; चिपळूणात सोमवारी शरद पवार यांची जाहीर सभा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांना शरद पवार देणार बळ; चिपळूणात सोमवारी शरद पवार यांची जाहीर सभा.

देवरूख.

   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस चिपळूण दौऱ्यावर येत असून सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. बहादुरशेख नाका येथील सावरकर मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे.राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. प्रशांत यादव यांना उमेदवारी मिळावी अशी खुद्द कार्यकर्त्यांची भावना आहे.दरम्यान, शरद पवार चिपळूणात येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
   प्रशांत यादव हे चिपळूणमधील प्रसिद्ध वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन आहेत.त्यांची शांत व संयमी व्यक्तीमत्व अशी ओळख आहे.राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर ते पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू असून पक्षाची ध्येयधोरणे ते जनतेपर्यंत पोहचवत आहेत.ते चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघ पिंजून काढत जनतेच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडवण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. जनतेचाही त्यांना मोठा पाठींबा मिळत आहे. जनतेशी नाळ असणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुखात ते सदैव धावून जात असतात. गोरगरीबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य घेवून ते समाजसेवाही करीत आहेत.गणेशोत्सव काळात तर त्यांनी चाकरमान्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर जबाबदारी खांद्यावर घेत आणखी जोरदारपणे पक्षसंघटना वाढीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.अगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातून प्रशांत यादव यांनाच उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
   दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे.खुद्द शरद पवार हे मैदानात उतरले आहेत.शरद पवार यांनी काही महत्वाच्या मतदारसंघाकडे अधिक लक्ष घातले असून दि.२२ सप्टेंबर रोजी ते चिपळूण दौऱ्यावर येणार आहेत.यादिवशी त्यांचा चिपळूणमध्ये मुक्काम असणार आहे.दोन दिवस ते चिपळूणात तळ ठोकणार आहेत.दि.२३ रोजी शरद पवार यांची बहादुरशेख नाका येथील सावरकर मैदानात जाहीर सभा होणार आहे.या सभेत शरद पवार काय बोलतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.दरम्यान, शरद पवार यांची चिपळूणात जाहीर सभा होणार असल्याने या सभेची जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.या सभेला चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या नेत्यांना या सभेसाठी सन्मानाने निमंत्रित करण्यात आले आहे.खुद्द शरद पवार हे चिपळूणात येणार असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शरद पवार यांचे चिपळूणात जंगी स्वागत केले जाणार आहे.