सिंधुदुर्गातील भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट
सावंतवाडी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, जिल्ह्यातील नवनिर्वाचित सदस्यांनी आणि प्रमुख नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण असून या भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्षांनी सर्व विजयी उमेदवारांचे विशेष कौतुक केले. सावंतवाडीचे भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, पंचायत समिती सदस्य गौरव मुळीक, युवा नेते आणि संघटक विनोद राऊळ तसेच समीर नेमळेकर यांनी या भेटीत सहभाग घेतला होता.याप्रसंगी चव्हाण यांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, हा विजय जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. जनसेवेच्या मार्गावर यशस्वी वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे काम करणे आवश्यक आहे. तळागाळातील सामान्य जनतेची कामे करून भारतीय जनता पार्टीचा नावलौकिक अधिक उज्वल करावा, असा मोलाचा संदेशही त्यांनी यावेळी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना दिला.

konkansamwad 
