शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली....सुप्रिया सुळेंची पोस्ट करत माहिती!

शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली....सुप्रिया सुळेंची पोस्ट करत माहिती!

मुंबई

 

       राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांची प्रकृती मागील आठवड्यात बिघडली होती त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पण चार दिवसांनी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज शरद पवार यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आली. शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.आम्ही बाबांना पुन्हा एकदा रुबी क्लिनिकमध्ये दाखल करत आहोत. त्यांच्या काही तपासण्या करण्यात येणार आहेत. तसंच त्यांना थोडा अशक्तपणा जाणवतो आहे आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात येत आहे अशी माहिती सुप्रिया सुळेंनी पोस्ट केली आहे.प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना सलाईन लावली जाईल, अशी माहिती आहे. अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती.मागील आठवड्यात शरद पवार यांच्या छातीत कफ झाल्यामुळे पवारांना बारामतीवरुन पुण्याला आणण्यात आले होते. शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. तेव्हा शरद पवारांना अचानक त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच दिवस रुबी रुग्णालयात होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. आता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्या काही चाचण्या केल्या जातील आणि त्यांना रुग्णालयात ठेवलं जाईल, डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी दिली आहे.