दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याचा कुडाळ पोलिसांनी केला पर्दाफाश

दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याचा कुडाळ पोलिसांनी केला पर्दाफाश

 

कुडाळ

 

      मालवण ते कुडाळ रेल्वे स्टेशन अशा एसटी बस प्रवासादरम्यान एका ज्येष्ठ महिलेचे तब्बल १३ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याचा कुडाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मंगेश नाथुभाई नटु, वय ५५ वर्षे, राहणार कोळीवाडा मुंबई याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. २० जानेवारी २०२६ ला सुहासिनी पाटकर या एसटीने प्रवास करत असताना ही चोरीची घटना घडली होती. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली होती, मात्र पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कुडाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने आरोपीचा माग काढत त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. पोलीस कोठडीदरम्यान आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ पोलिसांचे विशेष पथक मुंबईत दाखल झाले आणि तिथे लपवून ठेवलेले १३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. ऐन बस प्रवासात झालेल्या या मोठ्या चोरीचा तपास लावून पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवला आहे.