वंदेभारत एक्स्प्रेसची गुरांना धडक

वंदेभारत एक्स्प्रेसची गुरांना धडक

 

कुडाळ

 

        कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान अचानक जनावरे रेल्वे रुळावर आल्याने मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला भीषण अपघात झाला. या अपघातात जनावरांचा मृत्यू झालाच, परंतु एक जनावर ओव्हरहेड विद्युत खांबाला जोरात धडकल्याने रेल्वेची विद्युत यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. या घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक सलग साडेतीन तास ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे विशेषतः आंगणेवाडी जत्रेला आलेल्या भाविकांचे हाल झाले.मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी साडेअकराच्या सुमारास कुडाळजवळ आली असता, अचानक ट्रॅकवर बैल आणि म्हैस आली. गाडीचा वेग जास्त असल्याने त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत एक म्हैस ओव्हरहेड विद्युत वाहिनीच्या खांबाला जाऊन आपटली, ज्यामुळे खांब वाकला आणि विजेच्या तारा खाली आल्या. यामुळे कुडाळपासून मडगावच्या दिशेने जाणारा वीजपुरवठा खंडित झाला आणि सर्व गाड्या जिथल्या तिथे थांबल्या.घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. डिझेल इंजिन जोडून वंदे भारत एक्सप्रेसला घटनास्थळावरून हलवण्यात आले. त्यानंतर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून विद्युत वाहिनीची दुरुस्ती केली. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली. या काळामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.कुडाळ स्थानकात मांडवी एक्सप्रेस, उदना आणि जनशताब्दी एक्सप्रेस थांबल्या होत्या, तर झारापमध्ये राजधानी, सावंतवाडीत दुरांतो, मडुरामध्ये मरुसागर आणि कणकवली स्थानकात मंगला एक्सप्रेस खोळंबली होती.