देवरूख महाविद्यालयात शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

देवरूख.
विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबरच त्यांना आपल्या शाळा महाविद्यालयाकडून मिळणारी कौतुकाची थाप नेहमी अधिक मोलाची व प्रेरणादायी असते. विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक यश व त्यांनी यशाची गाठलेली उंची याचा सन्मान ज्यावेळी त्यांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये होतो तो क्षण त्यांच्यासाठी कायम अविस्मरणीय असतो. या सर्व आठवणींना उजाळा मिळण्याचे निमित्त होते, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभा २०२४-२५ चे . या समारंभाला विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने कार्यक्रम उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात मान्यवरांनी सरस्वती पूजनाने केली. उपस्थितांच्या स्वागतानंतर प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पारितोषिक वितरण समारंभाचा उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील शैक्षणिक यशाचा आढावा घेतला. प्रमुख अतिथी डॉ. निशिगंधा पोंक्षे यांचा परिचय प्रा. संदीप मुळ्ये यांनी केला. ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी डॉ.पोंक्षे यांचा यथोचित सन्मान केला. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन प्रा. प्रवीण जोशी यांनी केले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये श्रुती व गौरी सागवेकर, निधीता वेलवणकर, बुशरा वारोसे, सुचिता गीते, समृद्धी नार्वेकर, आर्या राजवाडे, रीया पडे, अनुष्का घाणेकर, श्रद्धा भिंगार्डे, ऐश्वर्या गुरव, समृद्धी चव्हाण, सुप्रिया चाचे, तन्वी कडू, पार्थ चव्हाण आणि प्रीती चाचे यांचा समावेश होता.
डॉ.निशिगंधा पोंक्षे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्याची त्रिसूत्री विशद केली. यशस्वीतेसाठी निरोगी आरोग्य, योग्य आहार व व्यायाम, आत्मविश्वास व स्व-शोध आणि आत्मपरीक्षण याद्वारे यशाचे शिखर गाठता येते, याबाबत सविस्तर भाष्य केले. नरदेह ही रत्नांची पेटी असून प्रत्येकाने शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे हितावह असल्याचे प्रतिपादनही याप्रसंगी त्यांनी केले. ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी आपल्या मार्गदर्शनात युवाशक्तीचे महत्त्व आणि राष्ट्र जडणघडणीत विद्यार्थ्यांचा आवश्यक सहभाग याबाबत विवेचन केले. संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात संस्था व महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम आणि अपेक्षित यश याबाबतचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीमा शेट्ये यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी रिया केदारी व पूर्वा वेंद्रे यांनी काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. शिवराज कांबळे, सहाय्यक अमोल वेलवणकर आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.