गोवा - पेडणे येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
गोवा
भारताचा इतिहास हा क्रांतीचा व प्रतिक्रांतीचा आहे.तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नंतर सम्राट अशोक राजाने या देशात क्रांती केली.त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देखील क्रांतीनंतर प्रतिक्रांती करावी लागली. बौद्ध धम्माचे मूळ भारत देश आहे.त्यामुळे प्रत्येक बौद्ध बांधवांनी धम्माप्रति जागरूक असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राध्यापक नंदगिरिकर यांनी पेडणे गोवा येथे सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात केले.यावेळी विचारमंचावर सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई गोवा विभाग अध्यक्ष तुकाराम तांबोसकर, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा कुडाळ अध्यक्ष अनिल पावसकर, तालुका शाखा वेंगुर्ला उपाध्यक्ष गजानन जाधव, तालुका शाखा सावंतवाडी अध्यक्ष महेंद्र सावंत, तालुका शाखा दोडामार्ग उपाध्यक्ष हरिश्चंद्र मणेरकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक नंदगिरिकर असे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ झाली नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.तो दिवस होता अशोका विजयादशमीचा.धम्मचक्र प्रवर्तन दिन हा विजयादशमी दिवशी साजरा केला पाहिजे.आज आपण ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत.यावेळी आपण सिंहावलोकन करणे गरजेचे आहे.आपल्या कार्याची निरंतर समीक्षा केली पाहिजे.जो धर्म कालसंगत नाही तो काळाच्या ओघात नष्ट होतो.जगात जी क्रिया-प्रक्रिया आहे ती निरंतर नाही ती नश्वर आहे.बुद्ध सांगतात एकच गोष्ट शाश्वत आहे तो म्हणजे 'बुद्धांचा धम्म' असा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आहे. बुद्ध धम्माचा वारसा जपला पाहिजे हा वारसा वाचवण्याचे काम आपण केले पाहिजे असे ते म्हणाले.याप्रसंगी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभाग या संस्थेला मोलाचे सहकार्य व योगदान दिले अशा व्यक्तींचा पुष्पगुच्छ व सन्माचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा गोवा विभाग तालुकाध्यक्ष तुकाराम तांबोसकर व प्राध्यापक नंदगिरिकर यांचे हस्ते दिप प्रज्वलीत करून तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.यांनतर बौद्धाचार्य सहदेव कदम यांनी त्रिसरण पंचशील, बुद्ध पूजा, भिमस्तुती घेवून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी अश्र्वघोष सांस्कृतिक कलामंच पावशी शाक्यानगर यांनी स्वागतगीत व भीमवंदना गीत सादर केले.कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा घेवून करण्यात आली.यावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुके व गोवा विभागातील धम्म बांधव- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंदीशा पवार, प्रास्ताविक नारायण आरोंदेकर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार मधुकर तळवणेकर यांनी मानले.