हेट स्पीच आणि धार्मिक भावना दुखावल्या बाबत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करा. संतप्त वेंगुर्लावासीयांची मागणी.
वेंगुर्ला.
विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणाऱ्या ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्या सोबत पत्रकार निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर हेट स्पीच केल्याविषयी भारतीय दंड संहिता कलम 153(A), 153(B), 295(A), 298, 505 आणि ‘आय.टी. ॲक्ट’ अंतर्गत गुन्हे तात्काळ दाखल करावेत, आणि त्यांना अटक करावी. हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. असे आज वेंगुर्ला येथील धर्माभिमानी यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे.
येथील ऍड.सुषमा प्रभुखानोलकर, गोपाळ जुवलेकर, विजय रेडकर, सावळाराम नाईक, प्रताप गावस्कर, नरेंद्र मांजरेकर, महेश बागायतकर, भिकाजी केरकर, महेश जुवलेकर, नंदा मांजरेकर, प्रवीण कांदळकर आदींनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात जाऊन याविषयी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या बरोबर चर्चा करून लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.