जिल्ह्यात अजूनही बिनविरोध निवडी शक्य - आमदार निलेश राणे

जिल्ह्यात अजूनही बिनविरोध निवडी शक्य - आमदार निलेश राणे

 

कुडाळ

 

     ठाकरे गटाकडे सक्षम उमेदवारांची कमतरता आहे. लोकांना जबरदस्तीने उमेदवारी देण्यात आली असून, आता अनेकजण आपले अर्ज मागे घेत आहेत. विरोधकांचे अनेक कार्यकर्ते आणि उमेदवार महायुतीच्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे वळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही जागा बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे, असे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. कुडाळ मध्ये महायुतीची बैठक झाली त्यांनतर आमदार निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
     आमदार निलेश राणे म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. महायुतीमध्ये कोणतीही कुरबूर नसून सर्व नेते आणि कार्यकर्ते एका कुटुंबाप्रमाणे एकत्र काम करत असल्याचे ते म्हणाले.
  मागील २७ वर्षांपासून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त राहिला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद ही सर्वात महत्त्वाची संस्था असून, तिथे जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न असेल. जिल्हा परिषदेचा 'टर्नओव्हर' किमान २५ टक्क्यांनी वाढवण्याचे आणि नवनवीन योजना राबवण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.