जागृती मंडळाचे 'जीवन गौरव', 'जागृती आयडॉल' पुरस्कार जाहीर.....१७ जानेवारी रोजी वितरण

जागृती मंडळाचे 'जीवन गौरव', 'जागृती आयडॉल' पुरस्कार जाहीर.....१७ जानेवारी रोजी वितरण

 

वेंगुर्ले

 

       जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या जागृती जीवन गौरव व जागृती आयडॉल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी जागृती मंडळाच्या स्थापनेपासून प्रत्येक उपक्रमात सहभाग घेऊन मंडळाला उपकृत करणारे स्व उन्मेष लाड (मरणोत्तर) व कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर यांची निवड करण्यात आली आहे. जागृती आयडॉल या पुरस्कारासाठी जागृती मंडळाचे स्टार खेळाडू अर्चना गावडे सावंत व स्वाती पालकर मुळीक यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, सचिव अमोल सावंत व सांस्कृतिक प्रमुख विवेक राणे यांनी दिली.
      पत्रकार स्व. संजय मालवणकर यांनी ४० वर्षापूर्वी वेंगुर्ल्यात सुरू केलेल्या जागृती मंडळाचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याकाळी मालवणकर यांनी पत्रकार शेखर सामंत आणि क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वाचे सहकार्य घेऊन या मंडळाची उभारणी करत शालेय मुलांना लहान वयातच हक्काचे व्यासपीठ दिले होते. या विविध स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन त्याकाळी अनेक मुलांनी स्वतःचे, स्वतःच्या शाळेचे, महाविद्यालयाचे व मंडळाचे नाव मोठे केले होते. या सर्व मंडळींच्या जोरावरच जागृती मंडळाचे कार्य वेंगुर्ल्याच्या क्रीडा व सांस्कृतिक चळवळीत उजवे ठरले. त्यामुळे सहकार्य करणाऱ्या हातांचा सन्मान करण्याचा निर्णय जागृती मंडळाने घेतला आहे. याच उद्देशाने गेल्या तीन वर्षापासून या पुरस्कांचे वितरण करण्यात येत आहे, असे अध्यक्ष दिलीप मालवणकर म्हणाले.नाटक, एकांकिका, कथाकवन, वक्तृत्त्व आदी कलेच्या विविध क्षेत्रात रस घेणारे उन्मेषकुमार मधुकर लाड हे जागृती मंडळाचे आधारस्तंम होते. त्याकाळी होणाऱ्या विविध स्पर्धांना ते परीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारून सहकार्य करत होते. मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन मंडळाला नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच पुढे असत. कलेच्या प्रांतात रस घेणारे व समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती बाळगणारे उन्मेषकुमार लाड यांची यावर्षीच्या जागृती जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने त्यांचा हा मरणोतर पुरस्कार त्यांचे कुटुंबिय स्वीकारणार आहेत. जागृती मंडळाच्या स्थापनेपासूनच मंडळाला नेहमीच सर्व प्रकारचे सहकार्य करणारे व जागृतीच्या विविध स्पर्धाना परीक्षक म्हणून सहकार्य करणारे कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बालू खामकर यांचीही जागृती जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे
       जागृती मंडळ म्हटले की जागृतीचे खेळाडू ही मोठी ताकद होती. जागृतीचे खेळाडू विविध ठिकाणच्या विविध प्रकारच्या स्पर्धामध्ये सहभागी होऊन आपली शाळा, महाविद्यालय आणि जागृती मंडळाचे नाव मोठे करत होते. या अशा खेळाडूंपैकीच पूर्वी अनेक ॲथलेटिक्स स्पर्धा गाजविणाऱ्या पूर्वाश्रमीच्या अर्चना चंद्रकांत गावडे व स्वाती प्रमाकर पालकर या दोन खेळाडूंचा यावर्षी 'जागृती आयडॉल' पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
       अर्चना गावडे यांनी त्याकाळी जागृती मंडळाच्या माध्यमातून विविध अॅवलेटिक्स स्पर्धांमध्ये सहभागी होत मैदान गाजविले होते. वेगवान धावपटू म्हणूनही त्यांनी सन्मान मिळवत वेंगुर्ले हायस्कूल व नंतर बॅ. खर्डेकर कॉलेजचेही नाव मोठे केले होते. सध्या त्या राजापूर येथे इर्डसइंड बैंकेत शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत असून लग्नानंतर त्यांचे नाव अर्चना किरण सावंत असे आहे. स्वाती पालकर यांनीही जागृती मंडळाच्या माध्यमातून विविध मैदानी स्पर्धामध्ये सहभागी होत बक्षिसांची लयलूट केली होती. १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, सडल सायकलीग, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धामध्ये त्यांनी अनेक वेळा सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे. महाविद्यालयीन जीवनातही विद्यापीठाच्या अनेक स्पर्धा त्यांनी गाजलिल्या आहेत. सध्या त्या मुंबई महानगरपालिकेच्या टेंमा केअर सेंटरमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव स्वाती किरण मुळीक असे आहे.
      या पुरस्कारांचे वितरण १७ व १८ रोजी मटवाडी वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जागृती मंडळाच्या ३७ व्या कला, क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशीही माहिती मालवणकर यांनी दिली.