एअर इंडियाने दोन नवीन आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान सेवा सुरू करण्याचा घेतला निर्णय
मुंबई
एअर इंडियाने दोन नवीन आंतरराष्ट्रीय मार्गावर विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली – हनोईदरम्यान १ मे पासून थेट विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटीनंतर हनोईतील एअर इंडियाची दुसरी विमान सेवा असणार आहे. मुंबई – टोकियो (हनेडा) दरम्यान १५ जूनपासून थेट विमान प्रवासी सेवा सुरू होणार आहे.दिल्ली-हनोई नवीन विमान सेवा आठवड्यातून पाच वेळा धावणार आहे. या विमान सेवेमुळे व्हिएतनामला भेट देणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच या विमान सेवेमुळे हनोईहून प्रवेश करून हो ची मिन्ह सिटीतून बाहेर पडणे शक्य होणार आहे. या मार्गावर ए-३२० विमान चालविण्यात येणार आहे. या विमानात बिझनेस क्लास, प्रीमियम इकॉनॉमी आणि इकॉनॉमी क्लासमध्ये जागतिक दर्जाचे केबिन इंटीरियर असणार आहे. या विमान सेवेमुळे व्हिएतनामला जाण्यासाठी महिन्याला ७ हजार प्रवासी प्रवास करू शकतील.मुंबई – टोकियो (हनेडा) दरम्यानची नवीन विमान सेवा आठवड्यातून चार वेळा एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ विमानाने होणार आहे. अलीकडेच, एअर इंडियाने दिल्ली आणि टोकियो (हनेडा) दरम्यान विमान सेवची संख्या आठवड्यातून ४ ऐवजी ७ केली आहे. यामुळे, जपानला प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांना आता नवीन केबिन इंटीरियर, आधुनिक इनफ्लाइट मनोरंजन प्रणाली, वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अनुभव मिळणार आहे.जपान, व्हिएतनाममधील पर्यटनस्थळे भारतीयांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करीत आहेत. दोन्ही देशांसोबतचे भारताचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आणखी दृढ होत आहेत. या नवीन मार्गांमुळे हे संबंध अधिक दृढ होतील. – निपुण अग्रवाल, मुख्य व्यावसायिक अधिकारी, एअर इंडिया.जपानमधील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय तेथे जात आहेत. जपान राष्ट्रीय पर्यटन संघटनेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये ३,१५,००० हून अधिक भारतीयांनी जपानला भेट दिली. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये प्रवासी संख्येत ३५ टक्यांनी वाढ झाली आहे. २०२५ मध्ये २ कोटीहून अधिक प्रवाशांनी व्हिएतनामला भेट दिली आहे.

konkansamwad 
