वसंतोत्सव व होलिकोत्सव

वसंतोत्सव व होलिकोत्सव

 

       माघ मासातील मासातील वसंतपंचमीपासून फाल्गुन- पौर्णिमेपर्यंत हा उत्सव करतात. चैत्र-वैशाख हा वसंत ऋतूचा काल असला तरी माघातच वसंताची चिन्हे दिसू लागतात. हिवाळा संपून हवा ऊबदार झाल्यामुळे वातावरण प्रसन्न होते. लोक आनंदी व उत्साही होतात. प्राचीन काळी वसंत ऋतूच्या स्वागतासाठीसुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव इ. उत्सव केले जात. सांप्रत उत्तर भारतात, विशेषतः राजस्थानात व ब्रजमंडलात वसंतपंचमीपासून वसंतोत्सव साजरा केला जातो. त्यानंतरचा होलिकोत्सव बहुतेक सर्वत्र होतो.संस्कृत साहित्यात वसंतोत्सवाची वर्णने विपुल आहेत. वसंतोत्सवात वनविहार, जलक्रीडा, नृत्य, संगीत, नाटक इ. मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करीत. पूर्वीचे राजे सपरिवार व सर्व ऐश्वर्यानिशी अशा उत्सवात भाग घेत. सामान्य नागरिक स्वच्छंदाने नृत्यगायनांत सहभागी होत. सर्वजण पिवळी वस्त्रे वापरीत व पिवळा रंग परस्परांच्या अंगावर उडवीत. स्त्रिया झोल्यावर झोके घेऊन वसंत विषयक गाणी म्हणत. राजस्थानातील राजपुतांमध्ये हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जात असे आणि काही प्रमाणात अजूनही केला जातो, गरीब, श्रीमंत, राव, रंक, सरदार, सैनिक सर्वजण भेदभाव विसरून या उत्सवात भाग घेत.विविध प्रकारची रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून स्त्री-पुरुष स्वैर संचार करीत आणि आनंद, मौज, विलास यात गुंग होऊन जात. निरनिराळ्या थरांतले लोक ढोल वाजवीत आणि कामदेवाची बहारदार गाणी म्हणत. राजमार्गावरून भ्रमण करीत. ती गाणी ग्राम्य असली, तरी त्यात सुंदर सृष्टिवर्णने असून हृदयस्पर्शी भावही आढळतात. फाल्गुन मासातल्या वसंतोत्सवाला फाग म्हणतात. त्या दिवसांत गाणे-बजावणे व रंग, गुलाल उधळणे यांना फारच बहर येतो.फाल्गुन शुद्ध अष्टमी हा दिवस त्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा असतो. मात्र पौणिमेच्या दिवशी सर्वत्र नाचरंगाचा कळस होतो. त्या उत्सवात जी गाणी गायिली जातात, त्यांनाही फाग म्हणतात. त्यांत आनंद, उत्साह, शृंगार, विलास यांचे मुक्त दर्शन होते. त्यात राधाकृष्ण, शिवगौरी, रामसीता, यांच्या रंगलीलांचे रसभरीत वर्णनही असते.होळीच्या सणातील स्वैरपणा व रंगेलपणा त्या गीतांत सहजपणे व्यक्त केलेला असतो. फाल्गुन पौणिमेला वसंतोत्सव संपतो व होलिकोत्सव सुरू होतो.