वाढत्या उन्हामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल...९ मार्चपासून शाळा भरणार सकाळच्या सत्रात...
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागला असून, याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली असून, सोमवार दि. ९ मार्च २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक समितीने ४ मार्च २०२६ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे लक्ष वेधले होते.प्रशासनाने काढलेल्या नवीन पत्रकानुसार, आता शाळांची वेळ सकाळी ७:०० ते ११:१५ अशी असणार आहे. दुपारच्या कडाक्याच्या उन्हापासून लहान विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक समितीच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य झाल्याने शिक्षक आणि पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
konkansamwad 
