नेरुरच्या जंगलात वनविभागाची मोठी कारवाई
नेरुर
सावंतवाडी वनविभागांतर्गत कुडाळ वनपरिक्षेत्रातील नेरुर कर्याद नारुर येथील शासकीय राखीव जंगलात औषधी वनस्पतीची तस्करी करणाऱ्या टोळीवर वनविभागाने कारवाई केली आहे. या मोहिमेत ‘सप्तरंगी’ या औषधी वनस्पतीची अवैध तोड करून वाहतूक करणाऱ्या एका इसमास रंगेहात पकडण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे 56,699 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपीचे नाव विठ्ठल लक्ष्मण लगड आहे. त्याच्याकडून 26 पोत्यांमध्ये भरलेली 961 किलो सप्तरंगी वनस्पती जप्त करण्यात आली आहे. 3 मार्चच्या रात्री वनविभागाचे पथक नेरुर परिसरात गस्त घालत होते. 4 मार्च रोजी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास कक्ष क्रमांक 90A च्या पायथ्याशी असलेल्या कोरड्या नदीपात्रातून डांबरी रस्त्यावर शिरओझ्याने सप्तरंगी वनस्पतीची वाहतूक करत असताना आरोपीला अटक करण्यात आली.सप्तरंगी ही मधुमेहावर गुणकारी मानली जाणारी औषधी वनस्पती आहे. त्यामुळे त्याची अवैध तोड आणि तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. आरोपी विठ्ठल लगड यांनी फारार आरोपींच्या संगनमताने राखीव वनात बेकायदेशीर प्रवेश करून ही तोड केल्याची कबुली दिली आहे. गुन्हयाचा तपास वनक्षेत्रपाल कुडाळ श्री. कुंभार हे सावंतवाडी उप-वनसंरक्षक मिलिश शर्मा व सावंतवाडी सहा. वनसंरक्षक एस. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

konkansamwad 
