जागतिक महिला दिवस...स्त्रीशक्तीची त्रिवेणी
८ मार्च हा दिवस स्त्रीशक्तीचा, स्त्रीच्या कर्तृत्वाचा, तिच्या स्वप्नांचा आणि संघर्षाचा गौरव करणारा आहे स्त्रीच्या सक्षमीकरणाचा विश्वास देणारा आहे. परंतु प्रत्येक वेळी आपण महिला दिन साजरा करतो, तेव्हा आपल्यासमोर काही ठरावीक नावे येतात. मोठ्या पदांवर काम करत असलेल्या किंवा प्रकाशझोतात राहिलेल्या आजच्या स्त्रिया किंवा इतिहासाच्या पानांवर ठळक अक्षरांनी लिहिलेल्या कालच्या स्त्रिया. मात्र त्या पानांच्या कडेला, सावलीत उभ्या असलेल्या काही स्त्रिया मात्र अजूनही दुर्लक्षित राहतात. येसूवहिनी म्हणजे बाबाराव सावरकरांच्या पत्नी, माई म्हणजे तात्याराव सावरकरांच्या पत्नी आणि ताई म्हणजे नारायणराव सावरकरांच्या पत्नी. या सावरकर कुटुंबातील 'तिघी' अशाच सावलीत राहिलेल्या, पण प्रखर तेज असलेल्या स्त्रिया. त्यांचा अबोल त्याग सदैव झाकोळलेलाच राहिला. खरे तर, महापुरुषांच्या मागे उभ्या असलेल्या स्त्रियांच्या वेदनांची समाजाला फारशी जाणीव नाही. त्यांचे नाव मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले जात नाही. त्यांचे उल्लेखही केले जात नाहीत. मग त्या कस्तुरबा गांधी असोत, कमला नेहरू असोत किंवा स्वातंत्र्ययुद्धात उल्लेखही न झालेल्या इतर अनेक अज्ञात समिधा असोत. खरे तर, इतिहासाच्या पानांवर ठळकपणे दिसणाऱ्या श्रेष्ठ नावांमागे हेच आधारस्तंभ खंबीरपणे उभे असतात. सावरकरांच्या कणखर व्यक्तिमत्त्वामागे या तिघींचा मोठा वाटा होता. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतो, तेव्हा त्यांनी सोसलेली १४ वर्षांची अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा, त्यांचे लेखन, त्रिखंडात गाजलेली त्याची मार्सेलिसची उडी, त्यांचा धाडसी स्वभाव यांचा उल्लेख होतो. बाबाराव सावरकर आणि नारायणराव सावरकर यांचे योगदानही अधोरेखित होते. पण या तिघांच्या मागे उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नींच्या आयुष्याचा विचार आपण कितीदा करतो? स्वातंत्र्यलढा म्हणजे केवळ हातात बंदूक घेणे किंवा तुरुंगात जाणे नव्हे. कधी कधी तो लढा आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्याचा संघर्ष असतो. येसूवहिनींनी हे दाखवून दिले. त्यांनी स्त्रियांना घराच्या चौकटीबाहेरचा विचार करायला शिकवले. पती अंदमानात शिक्षा भोगत असताना, घरची परिस्थिती बिकट असताना, समाजाचा बहिष्कार असताना त्यांनी खचून न जाता काम सुरू ठेवले. आजच्या भाषेत सांगायचे, तर त्या 'ग्रासरूट लीडर' होत्या. येसूवहिनींनी नाशिकमध्ये 'आत्मनिष्ठ युवती संघ' स्थापन केला होता. हा फक्त महिलांचा संघ नव्हता, तर एक विचार होता. स्वाभिमानाचा, स्वदेशीचा आणि संघटित स्त्रीशक्तीचा. परदेशी मालाची होळी, स्वदेशीचा आग्रह, ब्रिटिश सतेला अस्वस्थ करणारे सूक्ष्म पण प्रभावी विरोध ही सारी कृत्ये येसूवहिनी अमलात आणत होत्या.तात्याराव सावरकरांच्या पत्नी म्हणजे माई अत्यंत श्रीमंत घरातून आल्या होत्या. विवाहानंतर मात्र त्यांना जे जीवन मिळाले, ते अठरा विश्वे दारिद्र्याचे होते. परंतु आपले वैभव माहेरीच सोडून त्यांनी सावरकरांच्या घरात प्रवेश केला. देशाप्रति आयुष्य अर्पण करणारा पती, पतीवर चालणारे खटले, तुरुंगवास, समाजाची वाळीत टाकण्याची वृत्ती याविषयी त्यांनी एकदाही तक्रार केली नाही. त्यांनी कधीही पतीच्या कार्यात अडथळा आणला नाही.उलट, मनापासून साथ दिली. हे त्यांचे आंधळे समर्पण नव्हते. त्यांनी ते जाणीवपूर्वक हाती घेतलेले व्रत होते. त्यांनी आपला स्वाभिमान जपला घर सांभाळले. संकटांना तोंड दिले आणि पतीने उचललेला देशसेवेचा वसा सहज स्वीकारला. आज 'मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणार नाही', असे सहज म्हणता येते. पण त्या काळात माईंनी संपूर्ण आयुष्यच कम्फर्ट झोनशिवाय व्यतीत केले. नारायणराव सावरकरांच्या पत्नी शांताबाई म्हणजे ताई. या घरातले दोन्ही थोरले भाऊ अंदमानात शिक्षा भोगत आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आहे. समाजाने त्यांना वाळीत टाकले आहे, हे सारे माहीत असूनही त्यांनी या घरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भावनिक नव्हता. तो धाडसी होता. ते जाणूनबुजून आगीत उडी घेणे होते. पण त्यांनी तो संघर्षमार्ग निवडला आणि निभावला. महात्मा गांधींच्या हत्येनंतर सरकारने सावरकरांवर संशय घेतला. तेव्हा पुन्हा एकदा या कुटुंबावर संकट कोसळले. घरावर दगडफेक, समाजाचा रोष, चौकशा आणि हल्ले या सगळ्यातं या स्त्रिया पुन्हा उभ्या राहिल्या. स्वराज्यातही या कुटुंबाने वनवास भोगला. त्या वनवासात ताईंनी सारे घर सावरले. त्यांचा ठामपणा आणि निर्णयशक्ती या प्रसंगात अधिक ठळकपणे दिसली.आज आपण महिला दिन साजरा करतो. 'एम्पॉवरमेंट', 'इंडिपेन्डन्स', 'सेल्फ-लव्ह' या शब्दांवर चर्चा करतो. सोशल मीडियावर पोस्ट, शुभेच्छा, कार्यक्रम करतो. पण एम्पॉवरमेंट म्हणजे नेमके काय, तर सतत लढत राहणाऱ्या या तिघी आजच्या युवतींना त्यांच्या जगण्यातून आणि वर्तनातून काही स्पष्ट संदेश देतात. त्या सांगतात की, संघर्ष म्हणजे फक्त रणांगण नाही. आज अनेक मुली लहान-सहान कारणांनी डिप्रेशनमध्ये जातात.नात्यांबद्दल तक्रारी करतात. वेळ न दिल्याची खंत व्यक्त करतात. भावना महत्त्वाच्या आहेतच, पण या स्त्रियांनी वर्षानुवर्षे पतीचा सहवास न मिळता संसार केला. त्यांनी कधीच त्या अभावाचे भांडवल केले नाही. त्यांनी जे सोसले, ते एक व्रत मानून स्वीकारले त्यातूनच त्यांना मानसिक बळ मिळाले. या त्यागमूर्ती आपल्याला संदेश देतात की, स्त्रियांनी समर्पण आणि स्वत्व यांचा समतोल सांभाळायला हवा. या तिघी स्वतःला पूर्णपणे विसरून गेलेल्या नव्हत्या. त्यानी कुटुंब जपले आणि आत्मसन्मानही जपला. त्यांनी समाजकारण केले स्त्रियांना संघटित केले निर्णय घेतले स्वतःबरोबरच अनेक स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला. जगण्याचे ध्येय मिळवून दिले. समर्पण म्हणजे आत्मविस्मृती नव्हे आणि स्वातंत्र्य म्हणजे जबाबदाऱ्याऱ्यांपासून पळ काढणे नव्हे हे आजच्या स्त्रीनेही लक्षात घ्यायला हवे. महापुरुषांच्या मागे उभ्या असलेल्या स्त्रियांचा त्याग समाज फारसा ओळखत नाही पण त्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही. आजही अनेक स्त्रिया घर, नोकरी, मुले, समाजकार्य या सगळ्यांचा समतोल साधत असतात. त्यांना कदाचित पुरस्कार मिळणार नाहीत. पण त्यांचे कार्य तितकेच मोठे असते.अर्थात आजचा संघर्ष वेगळा आहे करिअर, स्पर्धा, सोशल मीडिया, मानसिक आरोग्य, नातेसंबंध यांचे ताण आहेत पण आज साघनेही आहेत, शिक्षण, कायदे, कुटुंबाचा पाठिंबा, संवादाची माध्यमे उपलब्ध आहेत. त्यामुळे माघार घेऊ नका. अन्याय सहन करू नका, पण इतरांवर अन्यायही करू नका. स्वतःला सिद्ध करा. स्त्रीशक्ती म्हणजे सहनशीलता आहे. स्त्रीशक्ती म्हणजे निर्णयक्षमता आहे स्त्रीशक्ती म्हणजे ध्येयनिष्ठा आहे. येसुवहिनी, माई आणि ताई या तिघींकडे पाहिले की, स्वत्य जपणारी स्त्री' ही स्त्रीशक्तीची व्याख्या समोर येते. त्यांनी पतीचा सन्मान केला, पण स्वतःची ओळखही जपली. त्यांनी दुःख झेलले, पण कटुता ठेवली नाही. समाजाचा रोष सहन केला, पण ध्येय सोडले नाही. ८ मार्चच्या दिवशी त्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ इतिहास आठवणे नव्हे. तो एक आरसा आहे आपण आज कुठे आहोत, आपण किती सक्षम आहोत, आपण किती सहज खचतो याचा विचार करण्याचा हा दिवस आहे. त्या सांगतात, 'मुलींनो, स्वप्ने बाळगा. उंच आकाशात उडा. उत्तम करिअर करा स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवा. पण त्याच वेळी मानसिक ताकदही वाढवा. नात्यांची किंमत ओळखा कुटुंब, समाज आणि स्वतः यांचा समतोल साया कारण खरी सशक्त आणि सक्षम स्त्री तीच जी स्वतःला सिद्ध करते, पण आपली मुळे विसरत नाही. त्यामुळे आजचा दिवस हा केवळ सेलिब्रेशनचा दिवस नाही चिंतनाचा आहे. आपण त्या स्त्रियांसारखे संकटातही ठाम राहू शकतो का, स्वत्व, जपत समर्पण करू शकतो का? आपण तक्रारीपेक्षा कृतीची निवड करू शकतो का? या प्रश्नांची उत्तरे शोधायला आपण तयार झालो, तरच महिला दिनाचा खरा अर्थ उमगेल. येसुवहिनी, माई आणि ताई या त्रिवेणीने आपल्याला शिकवले की, स्त्रीशक्तीचा खरा अर्थ गाजावाजा करण्यात नाही, तर शांत पण अढळपणे उभे राहण्यात आहे म्हणूनच ८ मार्चच्या महिला सक्षमीकरणाच्या दिवशी त्यांच्या स्मृतीला वंदन करताना आपण फक्त टाळ्या वाजवू नयेत, तर त्यांच्या धैर्याचा एक अंश तरी आपल्या आयुष्यात उतरवण्याचा संकल्प करावा.
konkansamwad 
