निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत दशावतार नाट्य महोत्सव....संजू परबांची माहिती
सावंतवाडी
शिवसेनेचे युवा नेते आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजू परब मित्रमंडळाच्या वतीने १५ ते १७ मार्च या कालावधीत भव्य 'ट्रिकसीनयुक्त' दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे १५ मार्चला सायंकाळी ७ वाजता स्वतः आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा शानदार शुभारंभ होणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी या महोत्सवाचे सविस्तर नियोजन जाहीर केले.यावेळी श्री. परब म्हणाले, या महोत्सवात प्रेक्षकांना थक्क करणारे 'ट्रिकसीन' पाहायला मिळणार यात १५ मार्चला भर्तरी पिंगळा, १६ मार्चला व्यंकट रमणा जय गोविंदा, १७ मार्चला जिव्हेश्वर हे नाट्य प्रयोग होणार आहे.दरम्यान वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे, तर गरजूंना मदतीचा हातही दिला जाणार आहे. यामध्ये फळ वाटप, धान्य वाटप आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत केली जाईल. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक गुरू मठकर यांच्या माध्यमातून सायकल वाटपाचा स्तुत्य उपक्रमही राबवला जाणार आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून सावंतवाडीतील रसिक प्रेक्षकांना दर्जेदार दशावतार पाहण्याची संधी मिळणार आहे. तरी या तीन दिवसीय उत्सवाचा लाभ सर्व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन परब यांनी केले आहे. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, सुधा कवठणकर, झेवियर फर्नांडिस, क्लेटस फर्नांडिस, राकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

konkansamwad 
