कोकणच्या आंबा-काजू बागायतदारांचा प्रश्न आता जीवन-मरणाचा - आमदार दिपक केसरकर
कोकणच्या आंबा-काजू बागायतदारांचा प्रश्न आता जीवन-मरणाचा
दीपक केसरकरांनी वेधले लक्ष; मंत्री भरत गोगावले कडून सकारात्मक प्रतिसाद
सावंतवाडी
कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीवरून सत्ताधारी पक्षाचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधत आपली आक्रमक भूमिका मांडली आहे."हे केवळ शेतीचे तांत्रिक नुकसान नसून, हा आता कोकणवासीयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे," अशा जळजळीत शब्दांत त्यांनी बागायतदारांची व्यथा सभागृहात मांडली. कोकणात आंबा आणि काजूचे ८५ ते ९० टक्के नुकसान झाले असून बागायतदार पूर्णपणे कोलमडला आहे, असे भीषण वास्तव मांडत त्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची आग्रही मागणी लावून धरली.आमदार केसरकर यांनी माहिती दिली की, कृषी विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे वस्तुस्थितीदर्शक अहवाल फेब्रुवारीतच सादर केले आहेत. जमिनीवर परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही विमा कंपन्यांच्या जाचक आणि क्लिष्ट अटींमुळे बागायतदारांना प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. "८५ टक्क्यांहून अधिक नुकसान होऊनही जर सरकार गप्प बसणार असेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे?" असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला विचारला.यावर उत्तर देताना मंत्री भरत गोगावले यांनी हवामान बदलामुळे आंबा मोहोराचे ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याचे मान्य केले. सरकारने आंबा पिकासाठी ६०४ कोटी आणि काजूसाठी ९४ कोटी रुपयांची विमा संरक्षित रक्कम ठेवली असून, त्यातील मोठा वाटा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'आंबा टास्क फोर्स'च्या माध्यमातून नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून, कोणत्याही बागायतदाराला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
konkansamwad 
