'घे भरारी' फाउंडेशनच्या महिलांनी साकारले दशावतारी नाटकाचे पात्र....

'घे भरारी' फाउंडेशनच्या महिलांनी साकारले  दशावतारी नाटकाचे पात्र....

 

सावंतवाडी 

 

    जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडीतील 'घे भरारी' फाउंडेशनच्या महिलांनी चक्क दशावतारी नाटकाचे पात्र साकारत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे आयोजित या कार्यक्रमात महिलांनी सादर केलेल्या 'कृष्णभोजन' या दशावतारी नाटकाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या लोककलेत महिलांनी उतरून दिलेला हा दणदणीत प्रयोग पाहण्यासाठी सावंतवाडीकरांनी मोठी गर्दी केली होती.गौरव शिर्के लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात महागणपतीपासून ते कृष्ण-सत्यभामेपर्यंत सर्वच भूमिका महिलांनी अतिशय ताकदीने साकारल्या. मेघा भोगटे (गणपती), रेखा कुमठेकर (ताम्रासूर), समीक्षा मडगांवकर (नारद) आणि सुस्मिता नाईक (कृष्ण) यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या प्रयोगाला वैभव पाटकर, निलेश मांजरेकर आणि समीर मांजरेकर यांनी दिलेल्या संगीत साथीमुळे नाटकाची रंगत अधिकच वाढली. महापुरुष दशावतार नाट्य मंडळाच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी झाला. कार्यक्रमाची सुरुवात साहस प्रतिष्ठानच्या दिव्यांग केंद्रातील चिमुकल्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी ज्योती दूधवडकर, नवनिर्वाचित नगरसेविका मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, दीपाली भालेकर यांच्यासह अनेक मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक महेश कुमठेकर यांच्या सहकार्याबद्दल त्यांचाही विशेष उपयोग सत्कार झाला. नाटकासोबतच महिलांसाठी नृत्य, गायन, लकी ड्रॉ आणि स्पॉट प्राईज अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.फाऊंडेशनच्या कार्याध्यक्ष मेघना राऊळ यांनी कार्यक्रमाचे ओघवते निवेदन केले. महिलांनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता लोककलेच्या क्षेत्रातही कशी 'भरारी' घेतली आहे, याचेच दर्शन या कार्यक्रमातून घडले.