देवगड समुद्रात घुसखोरी करणाऱ्या कर्नाटकच्या नौका जप्त...८ खलाशांना घेतले ताब्यात
देवगड
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई करत कर्नाटक राज्यातील एका ट्रॉलिंग नौकेला जप्त केले आहे. या कारवाईत नौकेवरील तांडेलसह आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या मासळीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने काल रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास गिर्ये समोरील सागरी क्षेत्रात गस्त घालत असताना कर्नाटक राज्यातील 'श्री. सानिध्या' नावाची ट्रॉलिंग नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ट्रॉलिंग करताना आढळून आली. सागरी हद्दीत अंदाजे १७ ते १८ फॅदम खोलीवर ट्रळींग सुरू असल्याचे निदर्शनास येताच गस्ती पथकाने नौकेचा पाठलाग केला. पथक जवळ येताच नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने वेगवान पाठलाग करून नौकेला ताब्यात घेतले.ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ सुधारित २०२१ अंतर्गत करण्यात आली असून देवगड परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव 'श्री. सानिध्या' आहे. या नौकेचे मालक गणेश लोकू बंगेरा असून या नौकेला केवळ कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रात मासेमारी करण्याचा परवाना असतानाही ती महाराष्ट्राच्या हद्दीत घुसली होती. कारवाईदरम्यान नौकेवरील तांडेलसह एकूण आठ खलाशांना ताब्यात घेऊन नौका देवगड बंदरात सुरक्षित आणण्यात आली आहे. सध्या जप्त मासळीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू असून त्यातून मिळणारी रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात येणार असून सुनावणीनंतर नौकामालक व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.या मोहिमेत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक टुकरुल, खवले, फाटक, बांधकर आणि सावजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीविरोधात विभागाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वीही अशा अनेक घुसखोर नौकांवर कारवाई करून मोठा दंड वसूल करण्यात आला असून यापुढेही ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

konkansamwad 
