कणकवली शहराच्या विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध - संदेश पारकर

कणकवली शहराच्या विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध - संदेश पारकर

कणकवली 

 

    कणकवली  शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नगरपंचायतीच्या माध्यमातून रस्त्यालगत काँक्रीट गटार बांधकाम व स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामांचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी नगरपंचायतीवर जो विश्वास टाकला आहे, त्याचेच हे फलित असून शहराच्या विकासासाठी नगरपंचायत पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी यावेळी केले.शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील छत्रपती शिवाजी चौक ते मराठा मंडळ रोडच्या डाव्या बाजूला स्ट्रीट लाईट उभारणीचे काम, तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय ते बाजारपेठ स्मशानभूमी या रस्त्यालगत काँक्रीट गटार बांधकामाचा प्रारंभनगराध्यक्ष संदेश पारकर व येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते तावडे कंपाऊंड समोर करण्यात आला.या विकासकामांसाठी नगरपंचायतीने नगरोत्थान निधीतून मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे. यामध्ये स्ट्रीट लाईटच्या कामासाठी अंदाजे ९ लाख ९९ हजार ५१४ रुपये, तर काँक्रीट गटार बांधकामासाठी सुमारे ४९ लाख ९४ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार या महत्त्वपूर्ण कामांना सुरुवात करण्यात आली असून, उर्वरित मागण्यांचाही सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.