घरगुती गॅसचा अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार.....जिल्हाधिकारी यांनी नेमले विशेष भरारी पथक

घरगुती गॅसचा अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार.....जिल्हाधिकारी यांनी नेमले विशेष भरारी पथक

सिंधुदुर्गनगरी

 

    जिल्ह्यात घरगुती गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही, काही ठिकाणी होणारी साठेबाजी आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी होणारा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या प्रकारांवर कडक नजर ठेवण्यासाठी विशेष 'भरारी पथके' तैनात केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अवैध साठेबाजी किंवा गॅसचा गैरवापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तेल कंपन्या आणि गॅस वितरकांच्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जिल्हा स्तरावर तातडीने दक्षता आणि फिरते पथक स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पथक जिल्ह्याच्या विविध भागांत अचानक तपासणी करून घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी होणारा वापर, सिलेंडर्सची बेकायदेशीर साठेबाजी आणि गॅसची कृत्रिम दरवाढ यांवर कठोर कारवाई करणार आहे. बैठकीत गॅस वितरकांनी एक महत्त्वाची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यात काही ठिकाणी विनाकारण गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या गाड्या अडवण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून सर्वसामान्यांना वेळेवर गॅस मिळण्यास उशीर होत आहे. यावर जिल्हाधिकारी श्रीम. धोडमिसे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारे गाड्या अडवणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पुरवठा सुरळीत सुरू असून कोणतीही टंचाई नाही, असे कंपन्यांच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठेबाजी करू नये किंवा पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर कोणाला गॅसच्या अवैध वापराबाबत माहिती मिळाली, तर त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही यावेळी सांगण्यात आले.