तळवणे शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला शिवकालीन इतिहास....प्रत्यक्ष शस्त्रे हाताळण्याची मिळाली संधी; दुर्ग मावळा, रक्षक प्रतिष्ठानचा उपक्रम
सावंतवाडी
तळवणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन भरवून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण व्हावी, त्यांना गड-किल्ल्यांचे महत्त्व समजावे आणि शिवकालीन वारशाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या मुख्य उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः शिवकालीन शस्त्रे हाताळून त्यांचा अनुभव घेतला. या प्रदर्शनामध्ये मराठा शस्त्रागारातील प्रसिद्ध धोप, दांडपट्टा, कट्यार, बिचवा, वाघनखे, खंडा तलवार, नागीन तलवार, ढाल, जिरेटोप आणि तोफेची प्रतिकृती मांडण्यात आली होती, इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना या शस्त्रांची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली. विशेषतः अफजलखान वधाच्या प्रसंगी वापरण्यात आलेल्या वाघनखांची माहिती सांगताना त्यांनी तो ऐतिहासिक प्रसंग जणू डोळ्यांसमोर उभा केला. यासोबतच विविध किल्ल्यांची माहिती देणारे शैक्षणिक सत्रही यावेळी घेण्यात आले.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्या जान्हवी बर्डे, मुख्याध्यापक युवराज गोसावी, विनोद झेंडे, प्रमोद बिरोडकर, तसेच शिक्षक बापुशेठ कोरगांवकर, मनिषा राऊळ, शिवाजी कवडे उपस्थित होते. याशिवाय पालकांमध्ये गोपाळ गावडे, किशोर पेडणेकर, पुर्वा मेस्त्री, नितीन गावडे, सुप्रिया मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे सदस्य आबा चिपकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

konkansamwad 
