जनतेचे प्रेम संजू परब यांना विजयी करेल - आमदार दिपक केसरकर

जनतेचे प्रेम संजू परब यांना विजयी करेल - आमदार दिपक केसरकर

 

सावंतवाडी
 

         जनतेच प्रेम संजू परब यांना विजयी करेल याची मला खात्री आहे. पक्षाला गरज असताना ते या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे फक्त तुमची साथ हवी आहे. मला आशीर्वाद दिलात तसाच आशीर्वाद शिवसेनेच्या २१ जणांना द्या, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. दरम्यान निवडणुकीत आमिष दाखवून पराभूत करण्याचे काम इथे सुरू आहे. मात्र, सावंतवाडीची सुज्ञ जनता अशा कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असे ते म्हणाले.
       शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा प्रभाग ७ चे उमेदवार संजू परब, महिला जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. निता कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, सौ. संजना परब, उमाकांत वारंग, संपर्क प्रमुख राजेश मोरे, आनंद शिरवलकर तसेच अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, भारती मोरे, सुरेंद्र बांदेकर, उत्कर्षा सासोलकर, गोविंद वाडकर, वैभव म्हापसेकर, परिक्षीत मांजरेकर, बंड्या कोरगावकर, स्नेहा नाईक, हर्षा जाधव, बासित पडवेकर, संजना पेडणेकर, प्रसाद नाईक, वेदिका सावंत, पुजा अरवारी आदी उपस्थित होते.       
          यावेळी श्री. केसरकर म्हणाले, सावंतवाडीला आरोग्य सुविधांची खूप गरज आहे. त्यासाठी आम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवश्यक सह्या न झाल्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प रखडला आहे. कोट्यवधी रुपयांची जमीन राजघराण्याला सरकार देत होत, पण आम्ही फुकट जागा मागितली नाही. तसेच, तलाव आमच्या मालकीचा म्हणणे योग्य नाही. हा तलाव सावंतवाडीचे नाक आहे, असे ते म्हणाले. यावेळी ते पुढे म्हणाले, सध्याच्या आजारपणामुळे मला जास्त फिरता येत नाही, याचा गैरफायदा घेऊन गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, आमच संपूर्ण पॅनल निवडणुकीत उभ आहे. मला जसा आशीर्वाद दिला, तसाच आशीर्वाद शिवसेनेच्या सर्व २१ उमेदवारांना द्या. भाजी मंडई, अंडरग्राउंड पार्किंग, पर्यटन केंद्र, सुसज्ज कॉम्प्लेक्स आणि मटण मार्केट उभी राहत आहेत. २४ तास पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ५७ कोटींची नळपाणी योजना मंजूर होऊन तिचे काम सुरू आहे. तुमची सेवा करण्यासाठी संजू परब, स्नेहा नाईक यांच्यासह नगराध्यक्षांना विजयी करा. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चांगले बोलू शकतात आणि तुमची उत्तम सेवा करतील. विजयाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहीन, असे ही केसरकर म्हणाले.