सिंधुदुर्गात स्वच्छता ही सेवा २०२५ मोहिमेअंतर्गत समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा निर्धार

सिंधुदुर्गनगरी
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वच्छोत्सव या थीमखाली साजरा करण्यात येत आहे. यास अनुसरुन जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन २० सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 ते 11.30 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे एकाचवेळी श्रमदानाच्या माध्यमातुन स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. समुद्र किनारे स्वच्छता कार्यक्रमांत जिल्हवासियांनी सहभाग नोंदवुन श्रमदान करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार स्वच्छता हि सेवा २०२५ हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत स्वच्छतेबाबत प्रबोधनपर उपक्रम, शालेय मुलांकरीता टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करणे, कचरा वर्गीकरण चर्चा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्न मंजुषा, विविध खेळ, एकल प्लॅस्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करणे, शुन्य कचरा, वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत खड्डा, शोष खड्डा निर्मिती करणे, अस्वच्छ ठिकाणाची कायमस्वरुपी स्वच्छता करणे. स्वयंस्फुर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट, गृहभेटीद्वारे जनजागृती करुन एक झाड आईच्या नावे उपक्रम राबविण्यात येणार आहे. बचत गट व संस्थाच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच "एक दिवस, एक घंटा, एक सोबत" या उपक्रमा अंतर्गत २५ सप्टेंबर २०२५ रोजी श्रमदानातून सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असुन पर्यटकांची रेलचेल हि समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक कचरा हा समुद्र किनारी जमा होत असतो. स्वच्छता हि सेवा २०२५ मोहिमेचे औचित्य साधुन जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा निर्धार जिल्हा परिषद, पंचायत समिती देवगड, मालवण, वेंगुर्ला व समुद्र किनारपट्टी असलेल्या ग्रामपंचायतीनी घेतला आहे. या कार्यक्रमांत जिल्हा वासियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे असे आवाहन रविंद्र खेबुडकर यानी केले आहे.