वेंगुर्ला नगर परिषदेच्या वतीने मांडवी खाडी येथे कांदळवन स्वच्छता मोहीम.

वेंगुर्ला.
केंद्र शासनामार्फत ‘’इंडियन स्वच्छता लीग - सीझन २’’ ही स्पर्धा आयोजित करणेत आलेली आहे. या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेने ‘’ वेंगुर्ला आयकॉन्स’’ नावाने सहभाग घेतलेला आहे.वेंगुर्ला आयकॉन्सच्या टीम कॅप्टन म्हणून डॉ धनश्री पाटील आणि ब्रॅंड ऍम्बेसडर म्हणून प्रा. सुनील नांदोसकर यांची निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने आज दि १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता मांडवी येथे कांदळवन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली व ‘’इंडियन स्वच्छता लीग - सीझन २’’ स्पर्धा आणि कांदळवन स्वच्छता मोहिमेबद्दल माहिती दिली. यानंतर टीम कॅप्टन डॉ. धनश्री पाटील यांनी कांदळवनाचे महत्व सांगून कांदळवन जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज असलेबाबत माहिती दिली. तद्नंनंतर माजी नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप, स्वामीनी महिला बचत गटाच्या श्वेता हुले, रोट्रॅक्ट क्लब चे प्रितेश लाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते कांदळवन स्वच्छता मोहीमेसाठी उपस्थित सर्वाना ‘’इंडियन स्वच्छता लीग - सीझन २’’ साठी अनावरण करण्यात आलेली जर्सी व कॅप चे वाटप करण्यात आले. मांडवी खाडीमधील कांदळवनामध्ये जमा झालेले प्लास्टिक व इतर कचरा नौकेमधून गोळा करण्यात आला तसेच मांडवी जवळील परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली.
वेंगुर्ला जल बांदेश्वर येथील झुलता पुल व नवाबाग समुद्र किनारा येथे गणेश चतुर्थी निमित्त मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. यामुळे सदर ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने वेंगुर्ला आयकॉन्सच्या टीम ने स्थानिक मच्छिमार बांधवांच्या सोबत सदर ठिकाणचा कचरा गोळा करून परिसराची साफ सफाई केली. सदर स्वच्छता मोहिमेअंतर्गत अंदाजे ५०० किलो एवढा कचरा वर्गीकृत करून संकलित करण्यात आला.
या स्वच्छता मोहीमेसाठी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी सौ.संगीता कुबल, टीम कॅप्टन डॉ. धनश्री पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप, माजी नगरसेवक श्री. प्रशांत आपटे, स्वामीनी महिला बचत गटाच्या श्वेता हुले, रोट्रॅक्ट क्लब चे प्रितेश लाड, मच्छिमार नेते गणपत केळुस्कर, पत्रकार भरत सातोस्कर,विनायक वारंग इ. मान्यवर तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे अधिकारी/कर्मचारी, बॅ. खर्डेकर महाविद्यालय व ग्रीन नेचर क्लब चे विद्यार्थी, स्वामीनी महिला बचत गटाच्या महिला व स्वच्छता प्रेमी वेंगुर्लावासीय नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन वेंगुर्ला नगर परिषदेचे अधिकारी वैभव म्हाकवेकर यांनी केले.