शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा : पालकमंत्री रविंद्र चव्हाण. कुडाळ येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम संपन्न.
सिंधुदुर्ग.
शासन नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित असते. या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यामध्ये महसूल विभागाची भूमिका महत्वाची आहे. महसूल सप्ताहानिमित्त सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
शासनाच्या कामकाजबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा यासाठी ‘महसूल सप्ताह’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ह्या उपक्रमांतर्गत गुरूवार 3 ऑगस्ट रोजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एक हात मदतीचा’ हा विशेष कार्यक्रम कुडाळ येथे संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या नारिकांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार नुकसान भरपाई धनादेश वाटप, कातकरी उत्थान अभियान अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप वैयक्तिक लाभांच्या योजना अश्या अनेक योजनांचा लाभ पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबियांना 4 लाख मदतीचा धनादेश देखील देण्यात आला. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या जिवावर उदार होवून वाचविण्याऱ्या तरुणांना पालकमंत्री यांनी प्रत्येकी 5 हजार रुपये मदत जाहीर केली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी करीष्मा नायर, विशाल खत्री, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, महाराष्ट्राची विकासाकडे घोडदौड सुरु आहे. जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांनी सकारात्मकतेने शासकीय योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवाव्यात. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 1 लाख लोकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याऱ्यांसाठी प्रशासनाने निधीची तरतूद करावी, जेणेकरुन त्यांना प्रोत्साहन मिळेल. पत्रकारांसाठी देखील विशेष योजना आणि निधीची तरतूद करावी. जिल्ह्यातील तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वयंरोजगारासाठी मदत करावी. यामुळे तरुणांचे होणारे स्थलांतर थांबेल आणि त्यांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल. सध्याची आपतकालीन परिस्थिती पाहता अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यालयात रहावे असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, महसूल सप्ताहानिमित्त नागरिकांना अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने विविध शिबीरे आयोजित केली आहे. या अंतर्गत फेरफार, वारस, प्रकल्पग्रस्त दाखले अशी अनेक प्रमाणपत्रे नागरिकांना घरपोच देण्यात आली. कातकरी समाजातील 26 लोकांना पंचनामा करुन जातीचे दाखले वाटप करण्यात आले. कातकरी बांधवासाठी शासकीय जमीनीवर घरकूल उभारणासाठी देखील प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
लाभार्थ्यांना लाभाचे वाटप-
अनिल बाळकृष्ण घाडी यांना पुराच्या पाण्यात वाहून जाताना वाचविल्याबद्दल प्रविण घाडी, दशरथ मैस्त्री, सिताराम परब, रामचंद्र परब यांना प्रमाणपत्राचे वाटप. अतिवृष्टीमुळे घर, गोठा, मांगर यांचे नुकसान झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटप- 20 लाभार्थी, अतिवृष्टीमुळे पूरात वाहून गेलेल्या व नुकसान झालेल्या पात्र कुटुंबाच्या वारसांना अनुदान वाटप- 1 लाभार्थी, अतिवृष्टीमुळे जनावरे, पशुधन नुकसान झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाटप -1 लाभार्थी, अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घरात घुसून अन्नधान्याचे नुकसान झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर आदेश-10 लाभार्थी, कृषी विभागामार्फत विविध योजनेमधून लाभ दिलेले लाभार्थी – 5 लाभार्थी, एकात्मिक आदिवासी विकास विभागामार्फत कातकरी समाजातील लोकांना विविध प्रकारचे लाभ वाटप- 5 लाभार्थी, संजय गांधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यंना प्रमाणपत्र वितरण- 5 लाभार्थी, नवीन शिधापत्रिकेचे वितरण- 2 लाभार्थी, विविध प्रकारचे दाखले वाटप – सेतू सुविधा केंद्र 2 लाभार्थी, नैसर्गिक आपत्तीत बचाव केलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र – 5 लाभार्थांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.