महायुतीसाठी सकारात्मक निर्णय न झाल्यास स्वबळावर लढू

महायुतीसाठी सकारात्मक निर्णय न झाल्यास स्वबळावर लढू

 

सावंतवाडी

 

         आगामी निवडणुकांमध्ये महायुती व्हावी यासाठी आम्ही आग्रही आहोत, परंतु आमचा योग्य तो सन्मान न झाल्यास स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असा इशारा शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान दीपक केसरकर यांनी "म्युट” ऑप्शन मधून बाहेर यावे आणि आम्हाला फक्त लढा, अशा सूचना द्याव्यात आम्ही स्वबळावर लढल्यास सिंधुदुर्गची ओळख "शिवसेनेचा बालेकिल्ला" म्हणून राज्यात पुन्हा करून देऊ, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा येथील गोविंद चित्रमंदिर सभागृहात पार पडला.
       यावेळी आमदार दीपक केसरकर, निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, संजय आंग्रे, अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नारायण राणे, दिनेश गावडे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, हर्षद डेरे, सुनिल डुबळे, अनारोजीन लोबो, भारती मोरे, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, प्रेमानंद देसाई, परीक्षित मांजरेकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
       यावेळी सामंत पुढे म्हणाले, केसरकर पायाने मारतात, ती गाठ हाताने सुटत नाही. महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे. वाईट घडू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेत आहेत. मात्र महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी आपली पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम असले पाहिजे. संजू परब सारखे सतर्क पदाधिकारी असल्यास संघटना नक्कीच वाढेल, दीपक केसरकरांनी उभी केलेली निधीची ताकद आणि नारायण राणेंच्या मागे असलेल्या लोकांनी निलेश राणेंच्या पाठीशी उभी राहील्यामुळे "शिवसेनेचा बालेकिल्ला" म्हणून सिंधुदुर्गची ओळख राज्यात होईल, यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा झेंडा फडकला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, आम्ही संयमी आहोत. एक घाव, दोन तुकडे करणार नाहीत. संपर्कमंत्री म्हणून बोलायचे कोणाशी, हा प्रश्न पडतो. मैत्रीपूर्ण लढतीसाठी युती झाल्यास सन्मान राखला गेला पाहिजे. हा मेळावा आदेशाचा आहे. शिवसेनेचा उमेदवार असणार, अशी भूमिका घेऊन प्रचार सुरू करा. मित्रपक्षाने आमचा सन्मान केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. "हम किसी से कम नहीं," असे सांगून केसरकरांनी लढ म्हटल्यास विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे उमेदवार उभे करू, असे त्यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात येणार असल्याची माहितीही दिली. यावेळी दीपक केसरकर म्हणाले, युतीत मिठाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही. मात्र स्थानिक पातळीवर वेगवेगळी विधाने येत आहेत. तोडायच असेल तर आमच्याकडून तुटले असे नको. मैत्रीचा धर्म आम्ही जाणतो. सोबत आले तर सोबत अन्यथा त्यांच्या शिवाय लढावे लागेल. महायुती झाली तर वेळेत झाली पाहिजे. नारायण राणे आमचे खासदार आहेत. त्यांना मान दिला गेला पाहिजे. महायुती न झाल्यास दुसऱ्याला संधी मिळता नये, याची काळजी घेतली पाहिजे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. तुमच्या प्रचाराला मी फिरणार आहे.
        यावेळी निलेश राणे म्हणाले, सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत आपली ताकद आहे. थांबायची वेळ गेली. त्यामुळे तयारीला लागा. सावंतवाडी, कुडाळवर डोळा आहे. आपली किंमत मैदानात दाखवा. गप्प बसण्याचे दिवस नाहीत. तीन पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. ताकदीला कोणी नाकारू शकत नाही. आमचे नेते युतीचा निर्णय घेतील. यावेळी राजन तेली म्हणाले, लढाईसाठी सैनिक तयार असले पाहिजे, ही नारायण राणेंची शिकवण आहे. कोणी अंगावर आले तर शिंगावर घ्यावे लागेल. निलेश राणेंची भूमिका स्वागतार्ह आहे. उद्या जिल्हा बँकेची सत्ता शिवसेना स्वबळावर आणू शकते. मला नोटीस आली नाही. नोटीशीला घाबरून पळणारा मी नाही. माझी लढाई चालू राहील. वेगळे लढण्याची इच्छा नव्हती. युती असताना समोरून स्वबळाचा नारा येतो. ऐनवेळी युती न झाल्यास काय? तयार असावे लागेल.
         जिल्हाप्रमुख श्री परब म्हणाले, माझ्या पाठीशी सर्वजण आहेत. जिंकण्यासाठी लढायचे आहे. केसरकरांनी कोट्यवधींचा निधी दिला, काम केले. याचा फायदा पक्षाला होतो. मंत्री उदय सामंत यांनी असेच लक्ष ठेवावे. हा मेळावा स्थानिक निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या संघटनात्मक तयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरला, ज्यात महायुतीतील समन्वयाबरोबरच स्वबळावर लढण्याची तयारी दिसून आली.