मराठी भाषेच्या जतनासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घ्यावा-प्राचार्य डॉ. पुरंधर नारे

मराठी भाषेच्या जतनासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घ्यावा-प्राचार्य डॉ. पुरंधर नारे

 

फोंडा

 

       कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे मराठी भाषेच्या अभिजाततेचा गौरव करण्याच्या उद्देशाने 'अनंतरंग' भित्तिपत्रिकेचे प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. भित्तिपत्रिकेचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि तिच्या जतन व संवर्धनाचा संकल्प सर्वांनी घेतला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सतीश कामत यांनी केले. त्यांनी अभिजात मराठी भाषेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडत भाषेच्या अभ्यासाचे महत्व अधोरेखित केले. नीता धुरी हिने आपल्या मनोगतातून मराठी भाषेबद्दलची आपली प्रेमभावना व्यक्त केली.  विद्यार्थ्यांनी मराठी भाषा आत्मसात करून तिचा अभिमान बाळगावा असे विचार  यावेळी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पुरंधर नारे यांनी मराठी भाषेच्या जतनासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घ्यावा असे सांगत, "भाषा ही फक्त संवादाचे साधन नसून आपली ओळख आणि संस्कृतीची वाहक आहे" असेही स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जगदीश राणे यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'अनंतरंग' भित्तिपत्रिका विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि भाषिक प्रतिभेचे उत्तम प्रतिबिंब ठरली आहे. या भित्तिपत्रिकेमुळे महाविद्यालयातील मराठी साहित्य चळवळ अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.